काटी , दि .१६ : उमाजी गायकवाड
स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाइल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुळजापूर तालुक्यातील काटी येथील तलाठी प्रशांत गुळवे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन व कार्यशैलीमुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून जिल्ह्यात सर्वाधिक 1374 खातेदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई- पिक पाहणी देखील त्यावर नोंदविली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात
सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी काटी गावात झाल्याने काटी गाव ई-पिक पाहाणी ॲपद्वारे ऑनलाइन करण्यात प्रथम क्रमांकावर आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून गाव स्तरावर तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी, तलाठी प्रशांत गुळवे व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून गुगल प्ले स्टोअरवर ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड कसे करावे, पीक पेरणी माहिती, जमिनाचा भुमापन क्र.स.नं/ गट क्रमांक, एकूण क्षेत्र व पोट खराबा, मिश्र पिक, निर्भेळ पिक आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
काटी येथील खातेदार शेतकऱ्यांची नोंदणी जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने बुधवार रोजी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते तलाठी प्रशांत गुळवे यांचे सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार तुषार बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.