काटी , दि . ३० :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार रोजी माळुंब्रा बीट अंतर्गत येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात बालविकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती घोडके, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच शामल हंगरकर,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असलेल्या पोषण माह व पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमात पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच अन्नधान्य, भाजीपाला, कडधान्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून पोषण आहाराचे व "बेटी बचाव बेटी पडाव" याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व महिलांना सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी स्वच्छतेविषयी व नियमित शौचालय वापरासंबधी शपथ दिली.
या कार्यक्रमात अंगणवाडी पर्यवेक्षिका घोडके, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या श्रीमती मारवाळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मातांना मार्गदर्शन करताना अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती घोडके म्हणाल्या की, आपल्या देशात वेग-वेगळ्या पद्धतींनी शिशुला अतिरिक्त खाऊ घातले जाते. त्यात नवजात शिशुच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक तत्वाची कमतरता असते. मग आपण नवजात शिशुच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक तत्वाची पूर्ती करण्याचे निश्चित कसे करू शकतो? शिशुच्या योग्य वाढी साठी लागणारी पोषक तत्वाची गरज पूर्ती करण्यासारख्या खाऊ पदारर्थ तयार करणे हे योग्य उपाय असल्याचे सांगून बालकांचे संपूर्ण कुपोषण निर्मूलन व बाळाच्या ऐन वाढीचा काळ 1000 दिवसांपर्यंत असून गर्भावस्थेपासून ते बाळ पहिले 3 वर्षाचे होईपर्यंत घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सौ.शामल हंगरगेकर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती घोडके, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या श्रीमती वर्षा मारवाळेकर,उमेदचे सोनवणे, ग्रा.पं. सदस्य भैरी काळे, सुहास साळुंके, पर्यवेक्षिका राठोड, पोलीस पाटील श्रीमती म्हेत्रे, सीएचओ राठोड, अंगणवाडी सेविका,मदतनीस, महिला बचतगटातील सदस्या, महिला भजनी मंडळ आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.