मुरुम, दि. १० :
ऊस उत्पादक शेतकरी, सभासदानी विठ्ठलसाई कारखान्यास ऊस पुरवठा करुन सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन व यंदाचा हंगाम यशस्वी करण्याकरिता कारखाना व यंत्रणा सज्ज असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी व्यक्त केले. बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा शुभ मुहूर्तावर पूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रविवारी दि.१० रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, विठ्ठलसाईचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, अँड. व्ही. एस. आळंगे, कारखान्याचे संचालक शरणाप्पा पत्रिके, केशवराव पवार, विठ्ठल बदोले, विठ्ठल पाटील, राजीव हेबळे, दिलीप पाटील, शिवलिंग माळी, संगमेश्वर घाळे, चंद्रकांत साखरे, माणिक राठोड, मल्लीनाथ दंडगे, अँड. विश्वनाथ पत्रिके, प्रमोद कुलकर्णी, राजू तोडकरी, पंकज खरोसेकर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
याववेळी बोलताना चेअरमन पाटील पुढे म्हणाले की, शेती ही महाराष्ट्राच्या अर्थ व्यवस्थेचा कणा असून साखर उद्योग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. सहकार क्षेत्रात कारखानदारी चालविणे व टिकविणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अवर्षण, कधी जास्तीचा पाऊस, कधी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न, बाजारपेठेत साखरेची तेजी-मंदी, शासनाची बदलती धोरणे या कारणांनी साखर उद्योग नेहमी अडचणी आला आहे. अशा प्रतिकुल काळातही हा उद्योग सर्वांनी सामुहिक जबाबदारीचे भान ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काळानुरुप बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकऱ्यांनी एकरी ऊसाचा उतारा वाढविण्यासाठी शेतीची नियोजनबध्द मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, पट्टा पध्दतीचा अवलंब, ८६०३२ ऊस बेणे लागवड करुन जास्तीत-जास्त प्रमाणात ठिंबक सिंचन व मेहनत केल्यास निश्चितच नव्वद ते शंभर टन एकरी उत्पन्न होऊ शकते. या भागातील शेतकऱ्यांनी या नगदी पीकाकडे सकारात्मक मानसिकतेतून पाहण्याची गरज आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून जोमदार ऊस या पारिसरात देसून येत आहे. परिसरातील एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्योगावर हजारो कुटुंबे अवलंबून असल्याने ही संजीवनी या परिसरात टिकून राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारखाना कार्यक्षेत्र असो की नसो त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकच व योग्य भाव आजपर्यत विठ्ठलसाईने दिलेला आहे व पुढे ही देणार. कुठल्याही शेतकऱ्यांचे बील गतवर्षीचे बाकी नाही. यंदाही पाच लाख मेट्रीक टन उद्यिष्टये असून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव दिला जाईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.