तुळजापूर दि . २
एच.डी.एफ.सी बँक, क्रिप्टो आर.सी .आर.सी. यांच्या सहयोगातून व कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून सूरू असलेल्या सर्वांगिण ग्रामिण विकास कार्यक्रम व क्रिप्टो रिलीफ कार्यक्रमाच्या अंतर्गत, विविध उपक्रमांचे उदघाटन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर व टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूरचे अधिष्टाता प्रो. रमेश जारे व कोहिजन फाऊंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डाॅ. दयानंद वाघमारे यांच्या हस्ते वस्तूचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी कोहीजन फाउंडेशन ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कपूर यांनी ऑनलाइन उपस्थित राहून कोहीजनच्या तुळजापूर टीमच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम हे ग्रामीण विकासाला चालना व दिशा देणारे आहेत असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात कोरोना काळात कुटूंबातील कर्ता पुरूष गमवलेल्या विधवा महिलांना प्रति कुटूंब पाच शेळ्या वाटप करण्यात आल्या. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतक-यांना ठिबक सिंचन खरेदीवर ४० टक्के अनुदान वाटप करण्यात आले.
५० गावातील गरीब परिवारांना राशन किटचे वाटप करण्यात आले. लसीकरणात प्रथम फळीत काम करणा-या ६१ स्वयंसेविकासाठी कोविड संरक्षक किट, प्रकल्पातील १० गावांसाठी पर्जन्यमापक यंत्रे इत्यादी लोकोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्यासाठी ५० गावात जनजागृती रथाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. त्या रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
कोरोनाच्या दुस-या लाटेत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर आणि कोहीजन फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र कोरोना समुपदेशन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यापासुन ही सेवा देणाऱ्या समुपदेशकांचा कोविड योद्धा म्हणून मनोहर दावणे,
गणेश चादरे, आनंद भालेराव, शुभांगी कुलकर्णी, शंकर ठाकरे, किरण कदम, सोनाली गुजराती, चंद्रकांत रोकडे, प्रदीप पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
समुपदेशन हेल्पलाईनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची व लसीकरण जन जागृती कार्यक्रमाची माहिती त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती क्रॉप्स इन्शुरन्स या प्रणाली वर माहिती भरण्यासाठीचे मार्गदर्शन केले. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनी खचून न जावू नये असे आव्हान समुपदेशन हेल्पलाईन समन्वयक गणेश चादरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक भाषणामध्ये बोलत असताना डॉ. दयानंद वाघमारे यांनी कोहीजन फाउंडेशन ने केलेल्या कामाचा आढावा दिला व भविष्यात काय करणार आहोत याची शाश्वती दिली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना श्री. तिर्थकर म्हणाले कि कोहिजन फाऊंडेशन ट्रस्ट कमी वेळेत खुप चांगल्या कामासाठी प्रसिध्द झाली आहे. भविष्यात कोहिजन फाऊंडेशन ट्रस्टला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. रमेश जारे म्हणाले की, कोहिजन संस्थेचे या भागातील काम खुप दुरगामी परिणाम करणारे असून एक प्रकारे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विकास कामाला एक उत्तम भागीदार मिळाला असे वाटते. टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून या भागाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जवळगा मेसाई गावचे वीडीसी सदस्य दादासाहेब चौधरी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दयानंद वाघमारे, सूत्रसंचालन मनोहर दावणे आणि आभार ज्ञानेश्वर बनसोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोसले, फुंडे, कांबळे, गवळी, कदम व सौ कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.