तुळजापूर, दि. ७ : डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने विधिवत आई राजा उदो, उदो ,सदानंदीचा उदो, उदोच्या जयघोषात घटाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना सोहळा थाटात संपन्न झाला. संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ अर्चना पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमाला तुळजापुरात गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. याप्रसंगी देवीच्या भोपे पुजारी बांधवांनी विधिवतपणे देवीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापना केली. महंत तुकोजी महाराज, पुजारी अतुल मलबा, सचिन परमेश्वर, गब्बर सोंजी, सुरेश परमेश्वर, शशिकांत परमेश्वर यांच्यासह इतर पुजाऱ्यांनी तुळजाभवानी देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली. त्यानंतर भवानी मातेचे दही आणि दुधाचे अभिषेक तसेच नैवेद्य दाखविण्यात आला.
घटस्थापना सोहळ्यासाठी संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील त्यांच्या पत्नी सौ अर्चना पाटील , नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत तुकोजी महाराज, महंत चिलोजी महाराज, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, उपाध्ये पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, सुधीर परमेश्वर, अविनाश गंगणे, विपिन शिंदे, श्रीराम अपसिंगेकर, मकरंद प्रयाग, बापुसाहेब रोचकरी, इंद्रजीत साळुंखे, नागेश साळुंखे, यांच्यासह इतर पुजारी बांधव उपस्थित होते.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता भवानीमातेचे दही दुधाचे अभिषेक करण्यात आले. त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा संपन्न झाली. धूपआरती काढल्यानंतर तीन कलशाची मिरवणूक काढण्यात आली, भवानी मातेच्या सिंह गाभाऱ्यामध्ये धन धान्य आणि काळ्या मातीच्या सहाय्याने घटस्थापनेची मांडणी करण्यात आली. त्यामध्ये मंगल कलश ठेवून त्याची विधिवत स्थापना करण्यात आली. यजमान जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी घटाचे पूजन केले.
आदिमाया आदिशक्ती मंदिर व त्रिशुल मंदिर येथे विधिवत घटस्थापना करण्यात आली या बरोबर देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली.