नळदुर्ग , दि .२२:  विलास येडगे

 नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या कामात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार हे न्यायालयाचा अवमान करीत अनाधिकृतपणे रस्त्याचे काम करीत आहेत. याच्या निषेधार्थ दि.२६ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथे बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 


याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ नळदुर्ग - अक्कलकोट या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करून संपादीत क्षेत्र सातबारावरून कमी करून त्याचा मावेजा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका क्र.४०२२/२०१९ दाखल केली असुन दि.२८ मार्च २०१९ रोजी संबंधित रस्त्याच्या कामास खंडपीठाने अंतरीम स्थगिती दिलेली असताना संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी  न्यायालयाचा अवमान करीत रस्त्याचे काम केले आहे. याविरोधात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी धाराशिव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुर, पोलिस अधीक्षक उस्मानाबाद  , तहसिलदार तुळजापुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नळदुर्ग यांना निवेदनाद्वारे व शेतकऱ्यांनी वैक्तिक निवेदन व अर्ज देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार रस्त्याचे काम करीत आहे. हे काम करीत असताना जुन्या पुलाचे काम करीत जुने पुरावे नष्ठ करण्याचे काम ठेकेदार व अधिकारी करीत आहेत. याचा निषेध म्हणुन दि.२६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग येथे बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.



 या निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शेतकरी संघर्ष समितीचे सरदारसिंग ठाकुर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती, पोलिस अधीक्षक धाराशिव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुर, उपविभागीय अधिकारी तुळजापुर तहसिलदार तुळजापुर व सहाय्यक पोलिस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आले आहे.
 
Top