वागदरी , दि .९ : एस.के.गायकवाड
महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी,मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांचा आवमान केल्याप्रकरणी राज्य समन्वयक जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथील रामदास जगताप यांची त्वरित बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निर्णयानुसार तलाठी संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देवून जगताप यांच्या निषेधार्थ तलाठी कर्मचारी,मंडळाधिकारी यांनी काळी फित लावून शासकीय कामकाज केले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे उदभवलेली नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी मोफत ई- पिक पहाणी करून ७/१२, ८-अ उतारा शेतकऱ्यांना देवून दिलासा द्यावा असा मेसेज तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी सोशल मिडीयावर टाकला असता जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथील राज्य समन्वय रामदास जगताप यांनी "मुर्खासारखे" मेसेज सोशल मीडियावर कशाला टाकता असा मेसेज टाकला. त्यामुळे महसूल प्रशासनातील तमाम तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार व तलाठी संवर्गातील अव्वल कारकुन यांचा अवमान झाला असून बेजबाबदार मेसेज टाकणारे रामदास जगताप यांची त्वरित बदली करण्यात यावी या मागणीचे व टप्प्याटप्प्याने या संदर्भात आंदोलन करण्याचे निवेदन दि.०६ अक्टोबर २०२१ रोजी तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी तलाठी संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा ए.एस.नाबदे,तुळजापूर तालुका अध्यक्ष एस.बी.शिंदे, तालुका उपाध्यक्ष अशोक भातभागे,मंडळाधिकारी एन.यु.शिंदे,तलाठी श्रीमती एच.बी.अंकुश,पी.पी.ढेकणे, अर्चना कदम,तलाठी शेवाळे, काळे, जगताप, जोगदंड आदीसह तलाठी कर्मचाऱी उपस्थित होते.