तुळजापूर, दि . ८ डॉ. सतीश महामुनी
अनेक वर्षापासून भारतामध्ये धार्मिक स्थळांमध्ये गर्दी हा सामान्य विषय आहे, मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे जगभरातील सर्व जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील देवस्थान देखील भाविकाविना बंद करण्यात आले, कोरोना नियमावलीचे पालन करीत भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांना खुली केली. मात्र सरकारने घातलेले निर्बंध कमी पडले आणि भाविकांची भक्ती मात्र ओसंडून वाहत आल्याचे दिसून येत आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये 7 ऑक्टोबरच्या अगोदर चार दिवस मोठ्या संख्येने भाविक फक्त तुळजापूर येथे दर्शनासाठी आले . भवानी मातेचे मंदिर बंद असताना देखील भाविकांनी राजे शहाजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार कळस दर्शन घेतले. सरकारचा निर्णय आगोदर भाविकांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मिळेल त्या मार्गाने प्रवास करून तुळजापूर गाठले व महादेवाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास केला. यावरून सरकारच्या कोरोना नियमावली पेक्षा देखील महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश या भागातून आलेल्या भाविकांनी आपल्या श्रद्धेला आणि तुळजाभवानी देवीच्या दर्शनाच्या प्रतिवर्षी करण्यात येणार्या खेट्याला महत्त्व दिले.
तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे गेल्या दहा वर्षापासून आता हा सरकारी नवरात्र महोत्सव झालेला आहे. येथे पुजारी वर्ग आणि मंदिर संस्थान पेक्षा सरकारचे नियम जास्त उपयोगात आणले जात आहेत. पोलिस बंदोबस्त आणि शासनाच्या निर्देशानुसार दहा वर्षांपूर्वीची यात्रा आणि आजची यात्रा यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. परिणामी यात्रा कमी झाली आहे. शासनाचे प्रतिनिधी कोणत्या अंगाने यात्रेकडे पाहतात याचे संशोधन करण्याची वेळ आज आलेली आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारा तुळजापुरातील व्यापार कोलमडून पडला आहे. पंधरा दिवसाच्या नवरात्रामध्ये वर्षभराचा खर्च व्यापारी बाजूला काढत होता हा निष्कर्ष देखील आता इतिहासजमा झाला आहे. प्रशासनाच्या या यात्रा हाताळणीमुळे मंदिराच्या भोवती चालणारा व्यापार ७५ टक्के कमी झाला आहे. लाखो रुपयांचे भाडे देणारे व्यापारी आपला व्यापार तोट्यामध्ये करताना दिसतात. अनेकांनी होणारा तोटा आणि चालू दुकानदारीचे ताण तणावामुळे व्यापार बंद करणे आणि अनेकांनी आत्महत्या देखील केलेले आहेत. तरीही सरकार मात्र जागे होत नाही, व्यापारी आणि पुजारी यांना कधी न्याय मिळणार आहे ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारची किती बंधने असली तरी भाविक भक्त मात्र सामान्य दर्शन करण्यासाठी तुळजापुरला येतो हा इतिहास आहे. तुळजापूरची यात्रा हाताळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी अनौपचारिकपणे तुळजापूर येथील यात्रा नियोजन समजून घेतले पाहिजे. कोणत्या भागामध्ये यात्रा जास्त प्रमाणात भरते आणि दहा वर्षांपूर्वीचे अधिकारी व मंदिर संस्थानचे विश्वस्त कर्मचारी यात्रा कोणत्या नियमांच्या आधारे यात्रा करत होते, याचा अभ्यास केला पाहिजे. कोठेही पोलिस बंदोबस्त लावायचा व रस्ते बंद करायची म्हणजे यात्रा हाताळणे आहे का याचा विचार जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला पाहिजे.
तुळजापूर शहराचा भौगोलिक परिसर येथील रहिवासी आणि पुजारी व्यवसाय करणारी मंडळी या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे.
प्रशासनाच्या आदेशावर तुळजापूरची यात्रा होणार असेल तर भविष्यात यात्रा कमी झाल्याशिवाय राहणार नाही,
नवरात्र महोत्सव पूर्वीप्रमाणे झाले पाहिजे ही तुळजापूरकरांची भावना आहे . महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या भागांमधून मागील आठ दिवसापासून भाविक भक्त पायी चालत आणि खासगी वाहनाने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येताना दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे सरकारने घातलेले निर्बंध याकडे देखील लोकांचे लक्ष आहे . मात्र पोटाची खळगी भरणे याकडे आज लोकांचे लक्ष लागले आहे. मागील दोन वर्षापासून अर्थकारण ठप्प झाल्यामुळे लोक कंगाल झाले आहेत. त्यांना आज रोजगार आणि व्यापार याची गरज आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी विशेष अधिकारी वर्गाने या बाबीकडे गांभीर्याने पाहून सर्वसामान्य भाविक भक्त आणि तुळजापुरातील व्यापारी वर्ग यांचा विचार करून यात्रा नियोजनाचे निर्णय घ्यावेत या सर्व परिस्थितीमध्ये सरकारच्या निर्बंध आपेक्षा लोकांनी भक्ती आणि दर्शन याला महत्त्व दिले आहे. याकडे देखील अधिकाऱ्यांनी सूक्ष्म दृष्टीने पाहावे लागेल. भाविकांना यात्रा सोपी वाटली पाहिजे बंदोबस्ताची भीती राहिली नाही पाहिजे याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत भाविक भक्तातुन व्यक्त केले जात आहे.