जळकोट, दि. २७


      
राष्ट्रीय महामार्ग -६५ , सोलापूर- हैद्राबाद दरम्यान असलेल्या जळकोट ता. तुळजापूर येथील बोरमण तांडा येथे महामार्गावरील दुभाजकातुन रस्ता ( मेडन ओपनिंग ) सोडण्यात यावे व हंगरगा मोड पासुन जळकोट गावापर्यंत सर्व्हिस रोड करण्यात यावा . अशी मागणी दि. २७   रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण , सोलापूर यांचेकडे केली आहे .
   वरील दोन्ही ठिकाणी बोरमन तांडा व हंगरगा मोड येथे राष्ट्रीय महामार्गावर मेडन ओपनिंग (दुभाजकातुन रस्ता ) न ठेवल्याने बोरमन तांडा येथील नागरिकांना दस्तापूरकडे २कि.मी. जावून  जळकोटकडे २ कि.मी .परत यावे लागत आहे . तसेच हंगरगा, नंदगाव, बोरगाव आदि गावांकडे जाण्यासाठी हंगरगा मोड पासून दस्तापुरकडे ४ कि .मी. जावुन ४ कि .मी .परत यावे लागते . अथवा जळकोट गावापासून हंगरगा मोड पर्यंत चुकिच्या बाजुने ( राँग साईड ) प्रवास करावा लागत आहे . यामुळे जीव धोक्यात घालुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
   तरी बोरमन तांडा येथील नागरिकांची व हंगरगा मोड येथील प्रवाशांची व वाहनधारकांची गैरसोय तात्काळ दूर करण्यात यावी. अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे केली आहे . यावेळी मनसेचे प्रमोद राठोड हे उपस्थित होते . यावर प्रकल्प संचालकांनी तातडीने ही दोन्ही कामे करण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे श्री . नवगिरे यांनी सांगितले .
 
Top