नळदुर्ग ,दि .१८ : एस.के.गायकवाड
नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्पामध्ये माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
शिक्षक भारती जिल्हा उस्मानाबाद व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा हे होते. यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारूती बनसोडे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, पत्रकार अरुण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर आधारित भैरवनाथ कानडे लिखित भारतरत्न डॉ . एपीजे अब्दुल कलाम व अन्य चरित्रात्मक पुस्तकाचा संच आपलं घर येथिल विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.
मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे थोर शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी संशोधन क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे देशहिताची काळजी घेणारेआहे. तितकेच ते प्रेरणादायी असून समाजात सामाजिक राष्ट्रीय बंधुता ,राष्ट्रीय एकात्मता याचे संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारे असून भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी पथदर्शक ठरणार असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात पन्नालाल सुराणा यांनी बोलताना व्यक्त केले. तर चरित्रात्मक व उद्बोधक पुस्तकांच्या वाचनामुळे आपणाला जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग अधिक सुकर होतो असे मारुती बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, पत्रकार अरुण लोखंडे, अनिल जाधवर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ कानडे तर सूत्रसंचालन व आभार जगदीश भंडारे यांनी केले.या कार्यक्रमास आपलं घर येथील कर्मचारी, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.