पंचनाम्याचे नाटक न करता सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याबरोबरच तुळजापुर तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. तरच तालुक्यातील शेतकरी टिकणार आहे अन्यथा येणाऱ्या काळात तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुळजापुर तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मुग, उडीद यासह ऊसाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आज शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आज पाण्यात आहे. त्यामुळे सोयाबीन अतीशय खराब झाले असुन सोयाबीनच्या शेंगा जाग्यावरच उगवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सर्वकांही सोयाबीनच्या पैशावर अवलंबुन असते. मात्र आता सोयाबीनच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढचे सर्व अंदाजपत्रकच कोलमडले आहे. तालुक्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले. शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने कुठलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अजुनपर्यंत तरी सरकारकडुन शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नाही.
केवळ जिल्ह्याचे पालकमंत्री पाहणी दौरा करून निघुन गेले. सध्याच्या कठीण काळात पाहणी दौरे वगैरे टाळुन शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकारने करणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांना मदत करतांना प्रत्येक वेळी सरकार हात आखडता का घेते हे समजत नाही. शेतकऱ्यांना मदत करतांना हात आखडणारे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र हात ढिला सोडुन त्यांच्यावर अक्षरशा पैशाची उधळण करते. सरकारची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. शेतकरी कायम संकटात नसतो. कधीतरी नैसर्गीक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदत करावी लागते. तरीही सरकार शेतकऱ्यांना मदत करताना अनेक नियम व अटी लागु करून अतीशय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना करते. आज पंचनामा करणे यासारखे नाटक करत बसण्याची वेळ नाही आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करून त्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे. पाऊस हा कांही विशिष्ट भागातच पडत नाही. आज संपुर्ण तुळजापुर तालुक्याला पावसाने झोडपुन काढले आहे. असे असताना कांही भागातीलच शेतकऱ्यांना मदत देण्याचे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना मदत करतांना आपले हात आखडता घेते ही वस्तुस्थिती आहे. सरकारने निदान यावेळी तरी शेतकऱ्यांना कुठल्याही अटी व शर्थी न घालता सरसकट सर्वच शेतकऱ्यांना मदत करावे तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होऊ शकते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्या जगाच्या पोशिंद्यावर संकट आल्यानंतर त्याला सरकारने तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. आज आणेवारी किंवा पंचनामे करण्याचे नाटक न करता सरकारने शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे.