जळकोट,दि.२३ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजीनगरमधील व्यापारी लाईनचे दुकाने फोडून चोरट्यांनी साडे नऊ लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवार(दि.२३) रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.


 ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर व्यापारी यांनी खरेदी केलेल्या मालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने व्यापार्‍यावर संक्रांत आली आहे.
जळकोट गावच्या मुंबई- हैद्राबाद महामार्गावरुन जळकोटवाडी (नळ) या गावाला रस्ता जातो. रस्त्याच्या बाजूला व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या भागातील व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून घरी गेले असता, शनिवारी मध्यरात्री २ते ३ वाजण्याच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून ठिकठिकाणी जबर चोऱ्या केल्या आहेत. 

चोरट्यांनी पाच दुकानावर डल्ला मारला. उमरगा जनता बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सिद्धनाथ सावंत यांच्या तिरुपती मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे दक्षिणेकडील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दिवाळीनिमित्त खरेदी करून ठेवलेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल, मोबाईल दुरुस्तीचे साहित्य, टि. व्ही. आदि साडेचार लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


संभाजीनगर भागातील गणेश अंगुले यांच्या संजीवनी फुटवेअर या दुकानाचे पश्चिमेकडील असलेला दरवाजा उचकटून गल्यातील रोख रक्कम १७ हजार ५०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. याच भागातील  अनिल पाटील यांच्या लक्ष्मी किराणा स्टोअर्सचे पूर्वेकडे असलेला दुकानाचे शटर उचकटून गल्यातील अंदाजे चाळीस हजार रुपये चोरट्यांनी पळवले. तर कुठला औषध सचिन सुरवसे यांच्या सचिन ड्रेसेस या दुकानाचे पश्चिमेकडील शटर काढून रोख दहा हजार रुपये व दिवाळीसाठी खरेदी केलेल्या ५१ हजार रुपयाची कपडे चोरट्यांनी चोरून नेले. या दुकानालगत असलेल्या मिलिंद डावरे  यांच्या अमिता क्लॉथ स्टोअर्स हे दुकान फोडून रोख १९००० रुपये व ३ लाख साठ हजार रुपयेचे कपडे   चोरट्यांनी लंपास केले. सर्व दुकानातून जवळपास साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे.

संभाजी नगर भागातील आळीपाळीने पाच दुकाने चोरट्यानी एकाच रात्री ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर फोडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या चोरीच्या एक दिवस अगोदर आलियाबाद रोड लगत असलेल्या माऊली मॉल फोडण्याचा चोरट्यानी अयशस्वी प्रयत्न केला होता. याच्या दुसऱ्या दिवशी मोठी चोरी झाली आहे. काही दिवसांवर दिवाळी सण आल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालावर व पैशावर चोरट्यानी डल्ला मारल्याने नागरिकातही भीतीचे वातावरण पसरले आहे. परराज्यातील मोठी टोळी या चोरीमध्ये सक्रिय असावी? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
Top