काटी , दि .६
तुळजापूर तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना सावरगाव, काटी महसूल मंडळात बुधवार दि.(6) रोजी दुपारी 3:45 ते 4:30 वाजनेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शेतातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन,कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. यंदा सुरुवातीपासूनच सावरगाव, काटी महसूल मंडळात जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.पाऊस जास्त झाल्याने जमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.सर्व साठवण तलाव तुडुंब भरुन सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पाण्यामुळे विहिरींचे नुकसान झाले आहे. सोयाबीन सारखे नगदी पिक पाण्यात गेल्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा मंदीराजवळ बसविण्यात आलेल्या स्वयंचलित पर्जन्यमान मापक यंत्राच्या चुकीच्या नोंदीमुळे 59.5 टक्केच पर्जन्यमान झाले असल्याचे दाखविण्यात आल्याने सावरगाव, काटी महसूल प्रशासनाने अतिवृष्टी झाली नसल्याचा अहवाल पाठविला. परिणामी या मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावातील अतिवृष्टीग्रस्थ शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
बुधवारी दुपारी पाऊन तास पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यांदेखत परतीच्या मुसळधार पावसाने नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होऊनही पंचनामे करण्याची महसूल विभागाला सवड मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बळीराजा अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना बळी पडत आहे. शेतातील सोयाबीन पीक पाण्यात असल्याने सडू लागले आहे.
परतीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे. पंचनामे लवकर न झाल्यास सरकार व प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून सावरगाव, काटी महसूल मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांमधून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सावरगाव,काटी मंडळाचा अतिवृष्टीत समावेश करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.