काटी ,दि .१४ :
तुळजापूर तालुक्यातील काटी, सावरगाव महसूल मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकतेच महसूल विभागाने पाहाणी करून अतिवृष्टीतून वगळलेल्या तालुक्यातील पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या सावरगाव व मंगरुळ मंडळातील गावांचा समावेश अतिवृष्टीच्या यादीमध्ये केल्यानंतर पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना देण्यात आले होते. त्याअनुषंगाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक या तीन स्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून काटी सज्जाचे तलाठी प्रशांत गुळवे, कृषी सहाय्यक मनोज माळी यांनी बुधवार दि. 13 पासून पंचनामे करण्यास सुरुवात केली असून तलाठी प्रशांत गुळवे व कृषी सहाय्यक मनोज माळी हे थेट प्रत्येक शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत आहेत. त्याचप्रमाणे पंचनाम्यावर तिघांच्या स्वाक्षऱ्या घेऊन शेतकऱ्यांकडून जबाबही नोंदविले जात आहे. तसेच नुकसान झालेल्या पिकाचे छायाचित्र त्या पंचनाम्या सोबत जोडण्यात येत आहेत.
चौकट
''अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्यानुसार बुधवारपासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. सावरगाव,काटी महसूल मंडलामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने या मंडळात फळबागासह इतर पिकांचे नुकसानीचे प्रमाणही जास्त आहे. येत्या रविवारपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होऊन नुकसानी बाबतचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे.
तलाठी प्रशांत गुळवे,सज्जा काटी ता. तुळजापूर