काटी , दि .५  : 

 तुळजापूर  तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असुन  तालुक्यातील सात महसूल मंडळापैकी पाच महसूल मंडळातील गावे वगळण्यात आलेली आहेत.  इटकळ व सलगरा (दि) या दोन गावच्या महसूल मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 


वास्तविक पाहता सप्टेंबरमध्ये संपूर्ण जिल्ह्यासह तुळजापूर तालुक्यात पावसाने थैमान घालून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्वच मंडळात सारखाच पाऊस झाल्याने जमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीन पिक व कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व साठवण तलाव तुडुंब भरुन सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पाण्यामुळे विहिरींचे नुकसान झाले आहे. सोयाबीन सारखे नगदी पिक पाण्यात गेल्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा मंदीराजवळ बसविण्यात आलेल्या स्वयंचलित पर्जन्यमान मापक यंत्राच्या चुकीच्या नोंदीमुळे 59.5 टक्केच पर्जन्यमान झाले असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे सावरगाव काटी मंडळा अंतर्गत येणारी गावे महसूल प्रशासनाने वगळली आहेत.यामुळे या महसूल अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकर्‍यांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, माजी व्हाइस चेअरमन नेताजी कदम आदींनी सोमवार दि. 4 रोजी तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देऊन  वगळलेल्या सावरगाव,काटी महसूल मंडळातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
Top