तुळजापूर , दि .१८: उमाजी गायकवाड

भाजपाचे  औसाचे आमदार अभिमन्यू पवार व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संयुक्तपणे 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पासून तीन अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी व निवडणुकीत दिलेल्या वचनांची सरकारला आठवण करून देण्यासाठी औसा ते तुळजापूर असे 57 किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस वाटेत विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर‌ औसा-तुळजापूरच्या सिमेवर व तुळजापूर मध्ये या पदयात्रेचे भाजप पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. 


सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात झाले आहे. परंतु सरकारने हेक्टरी दहा हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यासाठी  सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी द्यावी यासाठी  प्रारंभी आई तुळजाभवानी चरणी सोयाबीनची पेंडी व निवेदन देऊन शेतकऱ्यांना मदतीचे साकडे घातले. 


तुळजापूर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे,भाजपचे नेते संताजीराव चालुक्य, जिल्हा सरचिटणीस गुलचंद व्यवहारे,नगरसेवक सचिन पाटील,विशाल रोचकरी, शिवाजी बोधले, बाबा श्रीनामे,राहुल साठे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, नारायण नन्नवरे,सुहास साळुंके, देविदास काळे, सुभाष जाधव, सुनिल उटगे,सागर कदम, सागर पारडे आदींच्या उपस्थितीत आमदार अभिमन्यू पवार व माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांचा तुळजाभवानी मंदिरात सत्कार करण्यात आला. 

तुळजापूर  शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत घेऊन पत्रकारांशी संवाद साधताना औसा ते तुळजापूर पदयात्रे संदर्भात माहिती देऊन  आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन थकलो, विधानसभेत आवाज उठवला परंतु सत्ताधारी राज्य सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही,राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या संदर्भात आपण तहसीलदार,जिल्हाधिकारी,मंत्री,मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आता थकलो आहोत. त्यामुळे आता नवसाला पावणारी आई तुळजाभवानी चरणी निवेदन अर्पण करत असल्याचे  आमदार  पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचे झाले असून बळीराजा पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. परंतु या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सत्ताधारी राज्य सरकारकडे वेळ नसावी हि खंत व्यक्त करून हेक्टरी दहा हजार मदत हि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार असल्याचे मत व्यक्त करुन हेक्टरी 50 हजार मदत शेतकऱ्यांना देण्यास सत्ताधारी सरकारला सद्बुद्धी द्यावी असे साकडे आई तुळजाभवानीला घालण्यासाठी औसा ते तुळजापूर अशी 57 किलोमीटर पायी पदयात्रा काढून साकडे घातल्याचे सांगितले. 


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेली मदत व सत्ताधारी सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदतीचा विचार केला तर निश्चितपणे फडणवीस सरकारच्या कार्यकाळातच शेतकऱ्यांना जास्त मदत झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. या सरकारला 2019 मध्ये दिलेल्या वचनांचा विसर पडला आहे, पालकमंत्र्यांना  जिल्ह्यात फिरायला वेळ नाही, जनतेच्या संवेदनाची सरकारला किंमत नाही, सरकार या काळात शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडत आहे, सरकार आकड्यांचा खेळ मांडण्यात व्यस्त आहे, विमा कंपनीची मुजोरी वाढली आहे.विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कडून शेतकऱ्यांना पैशाची मागणी होत आहे. विमा कंपनीकडून 72 तासातच नुकसानीचा पंचनामा करा ही का? आठवडाभर का नाही? असा सवाल करत आपण याबाबत याचिका दाखल केली असल्याचे सांगत विमा कंपनीच्या मुजोरीपुढे सरकार कमजोर झाले का?  सरकार व विमा कंपनीत साटेलोटे आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शरद पवार शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांना मी सल्ला देण्या इतपत मोठा नसलो तरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करून नुकसान मिळवून द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली. 

 
Top