किलज, दि. ०१ रविचंद्र गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचे दिसून येत आहे. गावठी दारु, देशी दारु, सिंधी, गुटखा, आदी अवैध व्यवसाय सुरू असून येथील महिलांनी सोमवारी (दि.०१) रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेवुन किलज गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
किलज येथील महिलांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांची भेट घेवुन गावातील अवैध दारूचा सुळसुळाट कसा सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती दिली. गावात अनेक दिवसापासून अवैधरित्या दारू विक्री होत आहे, त्यामुळे शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी हतबल झाले आहेत, गावातील पुरुष मंडळी, व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत, अनेक कुटुंबात वाद होतात, दारुड्यांचे संस्कार युवा पिढीवर पडून ते व्यसनाधीन होत आहेत. यापूर्वीही गावातील दारूबंदीसाठी एकञ येत महिलांनी ग्रामपंचायत सोबत बैठक घेऊन बैठकीत दारु विक्री बंद करावी अशी दारु विक्रेत्यांना समज दिली होती. परंतू या दारू विक्रेत्यांनी अवैध दारु विक्री चालू ठेवली. याबाबत दि. ३१ मे २०२१ रोजी ग्रामपंचायतने लेखी अर्ज सादर केला होता. परंतू याची दखल घेण्यात आली नाही अशी खंत महिलांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत ठरावासह दारुबंदीसाठी निवेदन देण्यात आले असून कडक कारवाईची मागणी केली आहे.
यावेळी पोलीस पाटील सुनिता मर्डे, सरपंच अर्चना शिंदे, उपसरपंच दिक्षा गवळी, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी शिंदे, उमेद सीआरपी जगदेवी शेळके, रमाबाई गायकवाड, पूजा गवळी, करिष्मा ढाले आदी महिला उपस्थित होत्या.