उस्मानाबाद , दि .१७

 जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून बालगीतकार कविता पुदाले यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध  गीताचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्षा  अस्मिता कांबळे यांच्या  हस्ते  यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 


प्रारंभी मान्यवरांच्या  हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवर अतिथिंचे स्वागत गुलाबाची रोपं देऊन करण्यात आले. तदनंतर बालदिनामुळे सत्यहरी वाघ, गिरीष धोंगडे, क्षितिज हंगरगेकर, आदित्य बिडवे, मुक्ता पाटील, शर्वरी पाटील, योगेश्वरी रणदिवे या बालकांच्या कवितांचे सादरीकरण झाले. 


सुमधुर आवाजातील कवितांनी सभागृहाला मंत्रमुग्ध केले. या गाण्याच्या निर्मितीमागील प्रमाणिक भाव सुह्दयी शिक्षिका गीतकार कविता पुदाले यांनी व्यक्त केले. तसेच हे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा शाळांमधून वाजावे ही अपेक्षाही व्यक्त केली.  या गीतांचे सुंदर डिझाईन आणि गीताला संगीतबद्ध करतानाचे अनुभव प्रभाकर चोराखळीकर यांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती मध्ये विस्तार अधिकारी मा‌. मल्हारी माने, मुख्याध्यापक बसवंत गायकवाड, जेष्ठ साहित्यिक माधव गरड,  स्नेहलता झरकर, रमेशराव पुदाले उपस्थित होते. 


माधव गरड यांनी आपले मनोगत व्यक्त करून सुंदर बालकविता सादर केले. तसेच युवराज नळे यांनीही आपल्या मनोगताबरोबर मुलांना तसेच पालकांना प्रेरणादायी ठरेल अशीच बालकविता सादर करून रसिकांची मने जिंकली. अध्यक्षीय समारोप करताना  अस्मिता कांबळे यांनी शिक्षकांच्या कार्याचे आणि कार्यतत्परतेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, कोरोना सारख्या काळातही शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण चालू ही भूमिका स्वीकारून केलेले कार्य अगदी स्पृहणीय आहे. कविता पुदाले यांचे गीत मुलांना प्रेरणादायी ठरणारे तसेच शाळेकडे ओढावणारे असेच आहे. त्यांनी पुदाले यांचे विशेष अभिनंदन करून पुदाले दांपत्याचा सत्कारही केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ यांनी केले तर आभार डॉ‌. अरविंद हंगरगेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यिक, शिक्षक, तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. सुनिल उकंडे, मा. प्रभाकर चोराखळीकर, ओंकार उकंडे , युवराज्ञी उकंडे , यश उकरंडे ,अविनाश मुंढे यांनी परिश्रम घेतले.
 
Top