काटी , दि .१७ : उमाजी गायकवाड

गेल्या दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असुन  कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलं आहे. अशातच तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे  एक धक्कादायक घटना घडली असून कारवाईच्या भीतीने एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. 


किरण नागनाथ घोडके वय (32)  असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी आठ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील किरण नागनाथ घोडके यांचे वडिल एस.टी. महामंडळात चालक या पदावर कार्यरत होते.  त्यांचे सेवा निवृत्ती पुर्वीच कर्तव्य बजावत असताना हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले . त्यामुळे किरण घोडके यांच्यावर  कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पडली होती. अनुकंपा तत्त्वावर   ते  प्रथम करमाळा आगारात 2016 साली एसटीच्या सेवेत रुजू झाले होते. सध्या ते अक्कलकोट आगारात चालक म्हणून काम करत होते. आधीच एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पगार असताना मध्यंतरी कोरोना काळात दोन वर्षे कामावर ड्युटी मिळत नसल्याने त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्यांना एक लहान मुलगी आहे.
 एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने ते त्यांच्या मूळ गावी आले होते. घरच्या आर्थिक अडचणींमुळे ते मिळेल त्याठिकाणी खासगी वाहनावर चालक म्हणून जात होते. 

गेल्या दोन-तीन दिवसात राज्य शासनाने कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी व एसटी कर्मचारी तथा एसटी कर्मचारी संघटनेचे सचिव नागनाथ मसुते यांनी केला आहे.


 एसटी कर्मचाऱ्यांना असणारा  पगार व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने मागील दहा दिवसांपासून तोडगा न काढल्याने या घटनेस सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. सरकारच्या चुकीच्या वागणुकीमुळे तामलवाडी येथील एसटी चालक किरण घोडके यांचा मृत्यू झाला असून परिवहन मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व सरकारने लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तोडगा काढावा अशी मागणी एसटी वाहक तथा एसटी संघटनेचे सचिव नागनाथ मल्लिकार्जुन मसुते यांनी केली आहे.
 
Top