अणदूर, दि .१४
लोक सहभागातून खुदावाडी ता . तुळजापूर या गावाचा विकास झाला आहे. गावातील आदर्श शाळा,सुसज्ज ग्रंथालय पाहिल्यानंतर समाधान वाटले,याचाच आदर्श इतर खेडेगावाने घ्यावा, तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने अशा गावांना सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी गावभेटी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शरद नरवडे हे तर जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे, उपसरपंच पांडुरंग बोंगरगे,टाटा संस्थेचे गणेश चादरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना गुप्ता यांनी गावातील लोक वर्गणीतून बांधण्यात आलेल्या संत विनोबा भावे विद्यालय, पाण्याची टाकी, गावातील घरावरील महिलांची नावे, स्वच्छ रस्ते,वृक्षारोपण, साक्षरता, लसीकरण आदी बाबींचे कौतुक केले.विविध कार्यकारी सेवा सोसायटी,अंगणवाडी, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी भेट दिली. तर गावातील नवीन पाण्याची टाकी व धोब्बी कट्ट्याचे उद्घाटन केले. गावात लावण्यात आलेल्या बाराशे झाडांना विना मोबदला पाणी घालणाऱ्या संभाजी कापसे यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सिद्रामप्पा खजुरे यांनी तर आभार महादेव सालगे यांनी मानले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी महेश मोकाशे, देविदास चव्हाण, गोरोबा गायकवाड, नितीन कांबळे, प्रशांत कुंभार,ग्रामपंचायत सदस्य शेकप्पा सालगे,राम जवळगे,जनाबाई खजुरे,कमल सांगवे, वसंत कबाडे, प्रकाश राठोड,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम बोंगरगे,संगमेश्वर चिंचोले,भास्कर व्हलदुरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका दलभंजन आदी सह अंगणवाडी सेविका, आशा सेविका,विविध संस्थांचे प्रतिनिधी,महिला, नागरिक यांची उपस्थिती होती.