काटी , दि .९
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा (बुद्रुक) या निधीअभावी रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली.
या कामासाठी 2019 मध्ये मंजूर झालेल्या 37 लाख निधीमधून 2 किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असताना रस्ता मंजुरीसाठी तामलवाडी गणातील पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी देवकुरुळी व पिंपळा (बु.) येथील ग्रामस्थांना घेऊन या कामासाठी 2017 साली तीन दिवशीय लाक्षणिक उपोषण देवकुरुळी रस्त्यावर केले होते. त्या आंदोलनास यश येऊन जिल्हा परिषद निधीतून या कामासाठी 2019 मध्ये 37 लाख रुपये मंजूर झाले होते. त्या निधीतून 2019 मध्ये 2 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पिंपळा (बु.) ते तामलवाडी कामासाठी पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी पंचायत समितीच्या मासिक मिटींगमध्ये तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून उर्वरित कामासाठी 2020 मध्ये 44 लाख निधी मंजूर करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुषमा लोंढे यांनी जिल्हा परिषद निधीतून तरतूद करुन घेतली. या निधीतून दोन किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण होणार असून या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु उर्वरित पिंपळा (बु.) ते तामलवाडी पर्यंतच्या राहिलेल्या एक किलोमीटरसाठी 20 लाखांचा निधीसाठी पाठपुरावा करणार असून संबंधित गुत्तेराकडून दर्जेदार व उत्तम काम
होण्यासाठी अधिकाऱ्यांसह सर्वांनी लक्ष देण्याची गरज असून आपण स्वतः या कामावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.