उस्मानाबाद , दि. ८ :
नियमबाह्य गुंठेवारी करणाऱ्या नळदुर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर एक महिन्याच्या आत जिल्हा प्रशासनाने कारवाई न केल्यास दि. 10 डिसेंबर 2021 रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना उपोषणकर्ते नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या सदस्यानी सोमवार दि. ८ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, याच मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी पत्रकार संघटनेने लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणानंतर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेत रुजु झाल्यापासुन ते आजपर्यंत नगरपालिका हद्दीत बेकायदेशीर व नियमबाहय गुंठेवारी नियमाधीन केल्याचे उघडकीस आले आहे. मुख्याधिकारी म्हणुन नगरपालिकेचा पदभार घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेत अनेक नियमबाहय कामे केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील कांही जमीन मालकांच्या जमीनीच्या बेकायदेशीर गुंठेवारीची नियमबाहय नोंदी करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर या गुंठेवारीची नोंदी घेत असताना जमीन एका बाजुला आणि गुंठेवारी ची नोंद केलेली जमीन एका बाजुला आहे, असा प्रकार जमीन मालकांनी मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरुन केला आहे. त्याचबरोबर बनावट गुंठेवारी करुन पालिकेतील दप्तराला बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्या आहेत.
या नोंदीच्या आधारे जमीन मालकांनी प्लॉट घेणाऱ्या नागरीकांना अंधारात ठेऊन अशा जमीन मालकांकडून बोगस गुंठैवारीच्या नोंदीच्या आधारे प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधीत मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ या प्रकरणी कारवाई करावी व कारवाई होई पर्यंत मुख्याधिकारी यांची बदली करण्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.८ नोव्हेंबर २०२१ रोजी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सदस्य तानाजी जाधव,विलास येडगे व शिवाजी नाईक हे एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास बसले होते. वारंवार निवेदन देऊनही याबाबत काहींचं कारवाई झाली नसल्याने व याप्रकरणी आता एक महिन्यात कोणतीच कारवाई नाही झाली तर पुढील उपोषण औरंगाबाद येथे दि. १० डिसेंबर २०२१ वार शुक्रवार रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. तरी या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी यांची या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सदस्य तानाजी जाधव, विलास येडगे व शिवाजी नाईक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या पञकार संघाच्या उपोषणास राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी भेट देवुन पाठिबा दिला. संबधितावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले .
सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, रिपाइंचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, पञकार उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, महेबुब उस्ताद आदींनी उपोषणस्थळी भेट दिली.