तामलवाडी , दि .९:
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सौदागर बाळासाहेब डोंगरे यांनी पटियाला येथील थापर अभियांत्रिकी महाविद्यालयामधून रसायनशास्त्र विषयात पीएचडी मिळवली असून सोमवार दि. 8 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रम सोहळ्यात हि पदवी प्रदान करण्यात आली.
सौदागर डोंगरे यांचे प्राथमिक शिक्षण पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद, शेळगाव (आर), जळगाव व नागपूर येथे झाले. त्यांनी पृथ्वीच्या वातावरणातील हरित ग्रह कार्बन डायऑक्साइड वायूचे रूपांतर इथेनॉल इंधनामध्ये संशोधन कार्य केले आहे. त्यांना थापर महाविद्यालयातून डॉ. हरिपादा भुनिया, डॉ. नीतू सिंग व डॉ. प्रमोद कुमार बाजपई यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी भारत शासनाच्या विज्ञान आणि प्रद्योगिकी विभागाच्या प्रयोजिक प्रकल्पामध्ये काम केले. पुढील संशोधन कार्यासाठी डॉ. डोंगरे यांची अमेरिकेतील नामांकित केस वेस्टर्न विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. त्यांच्या पदवी बद्दल व अमेरिकेतील निवडीबद्दल परिसरातून आभिनंदन केले जात आहे.