नळदुर्ग , दि . १२ : विलास येडगे
नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे दि.७ नोव्हेंबर पासुन सुरू झालेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी माऊलीची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली.
मराठा गल्ली येथे दि.७ नोव्हेंबर रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली होती. हे पारायण साजरे होण्याचे ४३ वे वर्ष असुन सन १९७८ साली मराठा गल्ली येथे पारायण सोहळ्यास सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा पारायण सोहळा अतीशय साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवार दि.१२ नोव्हेंबर रोजी या पारायण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी काल्याचे कीर्तन ह. भ. प.श्री ढेरे महाराज यांचे झाले. काल्याच्या किर्तनानंतर संपुर्ण शहरांतुन माऊलीची पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी फुलाने सजविलेल्या पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. मराठा गल्ली येथुन सुरू झालेली मिरवणुक पांचपीर चौक, भोई गल्ली, क्रांती चौक, चावडी चौक, बसवेश्वर चौक, भवानी चौक, राम मंदिर, वीर सावरकर चौक, धर्मवीर संभाजी चौक मार्गे मराठा गल्ली अशी काढण्यात आली.
या मिरवणुकीत पुरुष व महिला भजनी मंडळ, शिवप्रतिष्ठानचे धारकरी तसेच शिवशाही तरुण मंडळ व पारायण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक चौकात पालखीचे रांगोळी घालुन महिलांनी भव्य स्वागत करून माऊलीचे दर्शन घेतले.
हा पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी पारायण समितीचे बलभीमराव मुळे,शिवशाही तरुण मंडळाचे पंकज हजारे, तानाजी जाधव, सुहास येडगे, शिवाजी सुरवसे, तुकाराम जाधव, गुंडू जगताप, मधुसुदन अलगुडे, संजय बेले, महेश जाधव, नेताजी किल्लेदार, बाबुराव सुरवसे, प्रमोद जाधव यांच्यासह पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.