काटी , दि.२

तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे  शिक्षणासाठी विविध अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यामुळे हि शाळा  शैक्षणिक दर्जा सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रगण्य मानली जात आहे.


 कोरोना संकटात शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्याचे नुकसान झाले .या संकटकाळात ग्रामीण भागातील काही शाळांनी वेगवेगळे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. गावात "घरोघरी अन गल्लो-गल्लीत शिक्षण "शिक्षण या संकल्पनेवर आधारीत राबविलेल्या अशाच प्रकारच्या अनोख्या शैक्षणिक उपक्रमामुळे ज्ञानार्जनाचे उत्तम कार्य साधले गेले. "शाळा बंद शिक्षण सुरु "हा उपक्रम यशस्वी झाल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. या उपक्रमात गावकरी सुद्धा  शाळेच्या विकासकामात व विद्यार्थी घडविणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होतात. सुमारे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते आठवी वर्ग असलेली शाळा आहे ,शाळेची पटसंख्या 150 आहे,त्यातही गावातील बहुसंख्य पालक शेतकरी व मजुर आहेत .कोरोना संकट उद्भभवल्यानंतर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला पण काही पालकाकडे आधुनिक ॲंड्राईड  मोबाईल  नसल्याने बहुसंख्य विद्यार्थ्याना  ज्ञानार्जन करणे शक्य  होऊ शकले नाही .सध्या पहिलीतील मुले दुसरीत शिकत आहेत ती वर्षभर शाळेकडे तोंड न बघताच पुढच्या वर्गात ढकलली गेली,अशा परिस्थितीत विद्यार्थ्याना अंकाची तोंड ओळखही होवू शकली नव्हती .


कोरोना काळात मुलांचे शिक्षण अखंडीतपणे सुरु राहिले पाहिजे हाच हेतु मनात ठेवून शाळेचे मुख्याध्यापक शेखु जेटीथोर उपक्रमशील शिक्षक भोयटे बलभीम यांनी गावातील प्रमुख व्यक्तिसोबत बैठक घेतली .बैठकीत सरपंच लक्ष्मण गोकुळे,उपसरपंच तुकाराम चव्हाण,पो.पाटील शञुघ्न चव्हाण ,शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ खलाटे,उपाध्यक्ष हणुमंत चव्हाण ,सदस्य नाना सुरडे ,राजेंद्र खलाटे उपस्थित होते ,भोयटे सरांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. सर्वांनी ती मान्य केली ,गावच्या लोकसहभागातुन गावातील गल्ली गल्लीतील भिंतीवर गणित ,मराठी ,इंग्रजी बेसीक माहिती व स्पर्धापरीक्षेची सुञे लिहुन काढली आणि गावातील भिंती बोलु लागल्या त्याच बरोबर येथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांचे सामान्य ज्ञान, चित्रकला स्पर्धा,आवडी निवडी व छंद जोपासले जातात. त्यामुळे या शाळेत सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यास मदत होत आहे. या सर्व उपक्रमाचा विद्यार्थ्याना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल ग्रामस्थ, पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

"कोरोना काळात मुलांच्या शिक्षणात पालकांची भुमीका महत्वाची असल्याने गावकर्‍याच्या सहकार्याने हा  शैक्षणिक उपक्रम सुरु केला,विद्यार्थी सहज जाता येता स्वत: व गटात या फलकाचे वाचन करत असे ,यामुळे विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होवून गावात कोरोना काळातसुद्धा एक प्रकारचे शैक्षणिक वातावरण तयार झाले होते .
बलभीम भोयटे,
 उपक्रमशील शिक्षक चव्हाणवाडी ता.तुळजापुर
 
Top