नळदुर्ग , दि . २८ :विलास येडगे
नळदुर्ग येथे बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर महामार्गालगत असणारे हॉटेलचालक घाण पाणी सोडत आहेत. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर कांही हॉटेलचालक तर महामार्गाच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकामध्ये खरखटे घाण टाकत आहेत. यामुळे महामार्गावर दुर्गंधी पसरली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ याची दखल घेऊन जे हॉटेलचालक हा प्रकार करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करून हा प्रकार बंद करावा अशी मागणी होत आहे.
नळदुर्ग बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर सध्या दुर्गंधी पसरली आहे. महामार्गालगत असलेले हॉटेलचालक हॉटेलचे घाण पाणी थेट महामार्गावर सोडत आहेत याचा परिणाम म्हणुन याठिकाणी मोठी दुर्गंधी सुटत आहे. विशेषम्हणजे या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात उभे राहुनच फळे विकण्याची पाळी येथील फळविक्रेत्यांवर आली आहे. यामुळे फळविक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या हॉटेलचालकांचे सांडपाणी जाण्यासाठी याठिकाणी गटार नाही त्यामुळे हे हॉटेलचालक हे घाण पाणी थेट महामार्गावर सोडत आहेत. नळदुर्ग--अक्कलकोट रस्त्याचे काम बसस्थानकासमोर मोठ्याप्रमाणात अर्धवट राहिले आहे. त्यामुळे याठिकाणी गटार करण्यात आलेली नाही त्यामुळे हे हॉटेलचालक महामार्गावर घाण पाणी सोडत आहेत याचा त्रास मात्र नागरीकांना होत आहे. नागरीकांचा हा त्रास कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग किंवा नगरपालिका प्रशासनाने याठिकाणी गटार बांधणे गरजेचे आहे.
कांही हॉटेलचालकांनी तर कहरच केला आहे. बसस्थानकासमोरील पोलिस चौकीसमोर असणाऱ्या महामार्गावरील दुभाजकामध्ये हॉटेलमधील घाण व खरखटे आणुन टाकत आहेत यामुळेही याठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. जो कोणी हा प्रकार करत असेल त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नगरपालिका प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुठभर लोकांमुळे नागरीकांना त्रास होत असेल किंवा नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगरपालिका प्रशासनाने याबाबत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.