चिवरी , दि .७ : राजगुरू साखरे

 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या  दोन्ही बाजूनी गावजोड जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे, 


पावसाळ्यात तर या रस्त्याला डबक्याचे  स्वरूप आले असून खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा? असा प्रश्न वाहन चालकासह प्रवाशांना पडत आहे.  येथील लक्ष्मी नगर ते नळदृग तुळजापूर रोडला जोडणाऱ्या चिवरी पाटी या पाच किलोमीटर  अंतराच्या रस्त्यावर   जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे  महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या  हजारो भाविकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या उपरोक्त प्रश्न लक्षात घेऊन चिवरी ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी पत्रही दिले आहे. परंतु यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही असे बोलताना सरपंच अशोक घोडके यानी    सांगितले. 

महालक्ष्मीची यात्रा अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांना रस्त्यावरील खड्ड्याचे धक्के खातच यावर्षी ही प्रवास करावा लागतो की काय? असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह भावीकातुन होत आहे.

           
अशोक घोडके सरपंच 
चिवरी 

ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दिला आहे, परंतु संबंधित प्रस्तावावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. याप्रश्‍नी वरिष्ठांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा.
                                      
 
Top