उस्मानाबाद , दि . २८ : राजगुरू साखरे
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपुन घेतल्या, नंतर बदलत्या वातावरणामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला, त्यामध्ये सुरुवातीला पावसाचा खंड पडला, त्यामध्ये उत्पन्नाच्या 50 टक्क्यांहून अधिक घट झाली. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली. अशा संकटाचा सामना करत असताना शेतकर्यांना आता पिक विमा कंपनीच्या कारभाराने गोंधळात टाकले आहे.
संबंधित विमा कंपनीने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम विमा देण्याची घोषणा केली होती . परंतु हा पिक विमा जिल्ह्यातील बोटावर मोजता येईल इतक्यात शेतकऱ्यांना मिळाला आहे. दिवाळी सण होऊन एक महिना होत आला तरी अद्याप शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उसनवारी करून ,लाखो रुपयांचा विमा संबंधित विमा कंपनीकडे भरला आहे, भरल्यापोटी एक दमडीही अजुन शेतकऱ्यांना मिळाला नाही , दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना विमा हप्ताची रक्कम देण्याची कबुली दिली असताना वेगवेगळी कारणे पुढे करून नफेखोरी विमा कंपनीने शेतकर्यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे विमा कंपनी बद्दल शेतकऱ्यांमधून असंतोष पसरला आहे .
त्याचबरोबर गतवर्षी २०२० खरीप हंगामाचा आणि चालू वर्षीचा खरीप हंगामाचा पिक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.