नळदुर्ग , दि . ०३
भविष्य निर्वाह निधी विभागाचे देणी २ कोटी ४८ लाख रुपये नळदुर्ग येथिल श्री तुळजाभवानी साखर कारखान्याने भरल्याने ७ वर्षापासून कुलूप बंद असलेला हा साखर कारखाना मंगळवार रोजी धनञयोदशीच्या मुर्हतावर उघडल्याने ऊस उत्पादक शेतकरी व कामगार वर्गातुन आनंद व्यक्त केला जात आहे.
दरम्यान श्री तुळजाभवानीने तात्काळ भविष्य निर्वाह निधीची देय रक्कम दोन कोटी आठेचाळीस लाख दिल्याने आज भविष्य निर्वाह निधी अधिकाऱ्यांनी श्री तुळजाभवानी कारखान्याचे कुलूप काढून त्याच्या चाव्या अवसायक सुदाम रोडगे यांना आज दुपारी सुपूर्द केले. यावेळी गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन दत्ता शिंदे, संचालक कार्तीक पाटील व अभिजित पाटील तसेच कॉंग्रेस प्रदेश सचिव सुनील चव्हाण, तुळजाभवानीचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांची उपस्थिती होती.
कारखान्याचे कुलूप काढल्यानंतर दत्ता शिंदे व सुनील चव्हाण यांनी कारखाना परिसर व यंत्रसामग्रीची पाहणी केली. यावेळी दत्ता शिंदे यांनी लवकरच कारखान्याचे मेन्टेनन्स करून येत्या जानेवारी महिन्यात कारखाना सुरू करणार असल्याचे सांगितले.
तर प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले म्हणाले की, गोकुळ शुगरने दिलेल्या रक्कमेतून लाईट, पाणी व अन्य शासन देणी देऊन सदर कारखाना तात्काळ सुरू करण्यासाठी सहकार्य करीत आहोत.
तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकासाचा केंद्रबिंदु असलेला श्री .तुळजाभवानी साखर कारखाना सुरु होण्यासाठी माजी मांञी मधुकरराव चव्हाण , काँग्रेस प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यानी पाठपुरावा केल्याने अखेर कारखाना चालु होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांतुन आभिनंदन केले जात आहे.