काटी ,दि .५ : उमाजी गायकवाड
तुळजापूर सोलापूर महामार्गावर तामलवाडी ता. तुळजापूर गावाजवळ अज्ञातानी दगडफेक केल्याच्या घटनेत दोन बसचे नुकसान झाले. तर या घटनेत प्रवाशाना दुखापत झाली नाही.माञ यामुळे वाहनचालक व प्रवाशात खळबळ उडाली.
ही घटना शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सव्वा दोन ते अडीच वाजणाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून उस्मानाबाद आगाराची उस्मानाबादहून बोरिवली (मुंबई) कडे जाणारी एस.टी.क्रमांक एम.एच.20 बी.एल.3926 व औरंगाबादहून विजापूरकडे जाणारी कर्नाटक डेपोची एस.टी.बस क्रमांक KA.28.F.-2185 या दोन एसटी बसवर अज्ञात व्यक्ती दगडफेक करून पसार झाले.
त्यामुळे या दोन्ही गाडीच्या समोरील काचा फुटल्या असुन सुमारे 34 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. सध्या एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एस.टी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत.मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे, यासाठी पुन्हा आंदोलनाने जोर धरला असून तामलवाडी येथे एसटी बसवर झालेली दगडफेक कोणी केली . याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. चालक व प्रवाशांच्या जिवितास धोका होईल या उद्देशाने केलेल्या दगडफेकी संदर्भात एसटी चालक ज्ञानेश्वर वाघमारे वय (45) यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या आदेशानुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं.201/2021 नुसार कलम 336,427 भादविसह सार्वजनिक संपत्ती अधिनियम 1984 नुसार शुक्रवार दि.5 रोजी 5:45 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ गाढवे हे करीत आहेत.
दगडफेक झालेल्या दोन्ही एसटी बस तामलवाडी पोलीस ठाण्यासमोर लावण्यात आल्या असून दगडफेक करणारे अज्ञात व्यक्ती कोण याचा शोध तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस घेत आहेत.