नळदुर्ग , दि .१५ : सुहास येडगे
नळदुर्ग शहरातील मराठा गल्ली येथिल सार्वजनिक शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने व सफाई होत नसल्याच्या कारणाने नागरीकांना शौचालय वापरता येत नाही, त्यामुळे मराठा गल्लीतील नागरीक गेल्या दोन महीन्यापासून या शौचालयाचा वापर करणे बंद करुन उघडयावर शौचास जात आहेत, नगर पालिका प्रशासनाला व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून ही शौचालयाची सफाई व पाण्याची सोय करुन दिली जात नाही. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासन या सफाई व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मराठा गल्लीतील सार्वजनिक शौचालय चालू करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.
मराठा गल्लीतील पालिकेचे सार्वजनिक शौचालय सध्या बंद आवस्थेत आहे, नागरीक या शौचालयाचा गेल्या चार ते पाच वर्षापासून चांगल्या प्रकारे वापर करीत होते, पंरतु सध्या पालिकेच्या सफाई विभागाच्या वतीने या शौचालाची सफाई केली जात नाही, परिणामी या शौचालयामध्ये पाणी नसल्याने मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या शौचालयाचा वापर सध्या बंद झाला आहे. गेल्या दोन महीन्यापासून या सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता होत नाही. शिवाय या शौचालयामध्ये मराठा गल्लीतील बोअरवरुन पाणी पुरवठा करण्याची सोय करण्यात आली होती. मात्र गेल्या महीन्यामध्ये पारायण कटटयासमोरील मैदानाचे काँक्रीटीकरण व नाली बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाला पाणी पुरवठा करणारा पाईप तुटला आहे, हा पाईप जोडण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागणार आहे. परंतु यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगून ही ते कर्मचारी या बाबीकडे जाणीवूर्पक डोळेझाक करीत आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नळदुर्गचे सुपूत्र अशोक जगदाळे यांच्या निवासस्थानी पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस नगरसेवक नितीन कासार उपस्थीत होते आणि याच बैठकीत मराठा गल्लीतील सार्वजनिक शौचालयाची व्यथा नागरीकांनी मांडली होती. त्यावेळी संबंधीतांना पाईप जोडून देण्यासाठी आदेश देण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांनीही एक दिवसात पाईप जोडून शौचालयाची स्वच्छता करुन घेतोत असे आश्वासन दिले होते . पंरतु या बैठकीला आठवडा होवून गेला तरीही पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाईप जोडला नाही. त्यामुळे पाण्याची सोय करण्यात आली नाही. तर स्वच्छता विभागाकडून त्या ठिकाणी पाणी नाही म्हणून शौचालयाची स्वच्छता करण्याचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या शौचालयाचा वापर बंद झाला आहे.
परिणामी मराठा गल्लीतील नागरीकांना आता या शौचालायाचा कांही एक उपयोग होत नसून सध्या नागरीक उघडयावर शौचास जात आहेत. त्यामुळे नागरीकांच्या अरोग्यास धोका ही निर्माण झाला आहे. विषेश म्हणजे या सार्वजनिक शौचालयात एका बाजूला महीला शौचालयाचा वापर करतात तर दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी या शौचालयाचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता सध्या महीलांच्या शौचालयाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यांना उघडयावरही जाता येत नाही. त्यामुळे अशा घाणीच्या साम्राज्यात आडकलेल्या या शौचालयामध्येच महीलांना तोंडाला रुमाल बांधून शौचास जावे लागत आहे. परिणामी याच घाणीमध्ये शौचालयाला महीला जात असल्याने त्यांचेही अरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व बाबीचा विचार करुन पालिका प्रशासनाने तात्काळ मराठा गल्लीतील सार्वजनिक शौचालयात पाण्याची सोय करुन या शौचालयाची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागीकांतून होत आहे.