काटी ,दि .०३ : उमाजी गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील काटी परिसरात गुरुवार दि. (2) रोजी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवून टाकली. या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंब, पेरु बागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. 


या पावसामुळे काटी कृषी मंडळा अंतर्गत येणाऱ्या 24 गावातील 670 हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्‍यात आल्या आहेत. तर कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील ऊसतोडी बंद झाल्या आहेत. परिणामी, कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेवर परिणाम झाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे पार कंबरडे मोडले आहे. सततच्या हवामान बदलाच्या संकटावर मात करीत द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षबागा  वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले. या  पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरल्याने कुजवा आणि दावण्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक ठिकाणी द्राक्षावरील फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. 

अवकाळीचा सर्वाधिक फटका काटी कृषी मंडळा अंतर्गत येणाऱ्या द्राक्षबागांना बसला आहे. त्याचबरोबर पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे  कांदा पिकाला थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने कांदा पिकालाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असताना किमान रब्बी हंगामात तरी चांगले उत्पादन निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच जिल्ह्यात पुन्हा तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काटी, सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासोबत सुटलेल्या वाऱ्यामुळे बोचऱ्या थंडीचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे अनेकांनी घरी राहणेच पसंत केले.


गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला असून आणखी मोठा पाऊस झाल्यास  माझ्या जवळपास 60 एकरावरील द्राक्षबागेला धोका वाढला असून हवामानातील बदलामुळे महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असल्याने खर्च वाढला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे कुजव्या, करपा, डावण्या, घड जिरणे, आदी संभाव्य रोगांपासून बागा वाचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातूनच फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. शेतात पाणी साठून राहिल्याने सर्वच पिकांच्या पांढरी मुळीची वाढ खुंटणार आहे.त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.


त्रिंबक भाऊ फंड
प्रगतशील द्राक्ष बागायतदार तथा
कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी.
जळकोटवाडी ता. तुळजापूर
 
Top