तुळजापूर , दि . ०३
तुळजापूर शहराजवळील नळदुर्ग रोडवरील हंगरगा गावानजीक वैयक्तिक स्वार्थापोटी काही लोकांनी डान्सबार सुरु केला असून हा डान्सबार कायमस्वरूपी बंद करण्यात यावा यासाठी तुळजापूर येथील स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार दि. 3 रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की , तुळजापूर हे तुळजाभवानी मातेचे तिर्थक्षेत्र असून या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. परंतु डान्सबारमुळे नवीन पिढीवर याचे विपरीत परिणाम होत असून तिर्थक्षेत्राचे पावित्र्य खराब होत आहे. श्री तुळजाभवानी ही छत्रपती शिवरायांची प्रेरणादायी व महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेकांचे कुलदैवत आहे. अशा पवित्र परिसरातील डान्सबार तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
निवेदनावर उत्तमराव अमृतराव, नगरसेवक राहुल खपले, अमर चोपदार, संदीप गंगणे, किरण घाटशिळे, हेमंत कांबळे, प्रताप सुरवसे, प्रकाश हुंडेकरी, मारुती नाईकवाडी, अंगद माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.