चिवरी , दि . ३१ : राजगुरू साखरे

एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे नैसर्गिक संकटाचा ज्वर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला सन २०२१ हे  वर्षे आपत्तीचे गेल्याचे दिसत  आहे, 


या मावळत्या वर्षात मार्चमध्ये अवकाळी गारपिटीचा तडाखा पुन्हा, एप्रिल-मे मध्ये अवकाळी पावसाने अनेक फळबागायती शेतकऱ्याची कंबरडे मोडले तर  नंतर जून मध्ये वेळेवर पाऊस येऊन शेतकर्‍यांनी पेरण्या लवकर आटोपुन घेतल्या. परंतु पिक फुलधारणीचे व फळधारणा अवस्थेत असताना महिनाभराचा पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आणि उरले-सुरले पीक हातात येईल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने मेहनत केली. परंतु सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये संपूर्ण पिकाची दाणादाण उडवून दिली. यात खरीप हंगामातील पिकांमध्ये, सोयाबीन उडीद, मुग, तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 


या नुकसानीचे पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी नोंदवून, पंचनामे होऊन देखील अनेक शेतकरी पिक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत, त्याचबरोबर ऐन  रब्बी हंगामामध्ये महावितरणच्या मनमानी कारभारामुळे  कृषिपंपांची वीज तोडणीच्या मोहिमेमुळे शेतकऱ्याच्या संकटात आणखीन भर पडली आहे.  अशा सुलतानी संकटाचाही  शेतकऱ्यांना मावळत्या वर्षात सामना करावा लागला आहे. परंतु जिल्ह्यातील बळीराजाला कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो हे मात्र नक्की.  शेतकऱ्यांना आता जागतिक हवामान बदलाचे चिन्हे दिसू लागली आहेत.  हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये पावसाळ्याचा अनुभव येत आहे. कधी हवामान कोरडे तर कधी अचानक ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्याचा अनुभव येत आहे.


 एकंदरीत सरत्या वर्षाला निरोप देताना शेतकऱ्याच्या दृष्टीने हे वर्ष नुकसानीचे गेल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, सन २०२१ या वर्षामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना, दुसरीकडे निसर्गही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही . एकंदरीत दरवर्षी नैसर्गिक संकटाना सामोरे जाणारा बळीराजा यावर्षीही संकटाला सामोरे गेला आहे. यातुन शेतकऱ्यांची सुटका कधी व केव्हा होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांला कायम  सतावत आहे.
 
Top