वागदरी , दि . १८ : एस.के.गायकवाड:
सन २०२१ खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची विमा रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेत जमा झाली आहे. परंतु पन्नास टक्केहून अधिक शेतकरी विमा रक्कमे पासून वंचित राहिले आहेत. त्या वंचित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे धाव घेतली असून पिक विमा मिळावा म्हणून अर्ज देण्यासाठी एकच गर्दी केली असून त्यांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहवे लागत आहे .
जून-जुलै २०२१ दरम्यान खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर पिकांचा आँनलाइन पिक विमा भरून शेतकऱ्यांनी पावती घेतलीआहे. त्या पैकी सध्या सोयाबीन पिकाचा विमा मंजूर झाला आहे. परंतु जवळपास पन्नास टक्के पेक्षा अधिक शेतकरी या विमा रक्कमेपासून वंचित आहेत. अशा वंचित शेतकऱ्यांनी संबंधित तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी अर्ज करण्याचे सांगितले असल्याने तुळजापूर तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली असून अर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक शारीरिक व मानसिक पिळवणूक होते आहे. शासनाने पिक विमा रक्कमेपासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करून त्यांची हक्काची विमा रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी होत आहे.