काटी , दि . २४ : उमाजी गायकवाड
स्नेहबंध ट्रेकर्स ग्रुप पिंपळा बुद्रुक ता. तुळजापूर यांनी लोहगडचा ट्रेक यशस्वी पूर्ण केला. भूगोलाचे अभ्यासक प्रा.डॉ. शिवाजी मस्के व तानाजी मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व व भौगोलिक स्थिती यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
विनोद चुंगे, विठ्ठल नरवडे, ज्योतिबा जाधव, मारुती लोहार, सुनील बंडगर, प्रमोद चुंगे, तानाजी म्हेत्रे, शिवाजी मस्के हे ट्रेकर्स यात सामील होते.
लोहगड हा किल्ला ३४०० फूट उंची असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ मावळ नावाच्या डोंगररांगेवर विस्तारला आहे. हा किल्ला पावन खोरे व इंद्रायणी खोरे या दोन भागात विभागला आहे. त्याबरोबर हा किल्ला जवळच्या विसापूर किल्ल्यास जोडलेला आहे. या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने खूप वर्ष राज्य केले आणि मराठा साम्राज्याचे छत्रपती राजे शिवाजी यांसाठी हा किल्ला राजकीय कारणांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरला.
भौतिक सुखाच्या मागे धावताना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य जोपासणे व निसर्ग नि मानवी जीवन यांचा समन्वय राखत जीवनाचा आनंद घेण्यासाठी असे ट्रेक उपयुक्त ठरत असतात. शिवाय गड-किल्ल्यांची भटकंती यातून अभ्यासलेला इतिहास प्रेरणा ही देतो. गड - किल्ले की शौर्याची प्रतीके आजच्या युगातही प्रेरणादायी ठरून जीवनात चैतन्य आणतात. शिवाय ऐतिहासिक पर्यटन हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ही उपयुक्त ठरते.
लोहगड किल्ला हा अति मजबूत बुलंद आणि दुर्जेय आहे. १६५७ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात सामील केला. सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य या गडाभोवती आपल्याला पाहावयास मिळते. पायथ्यापासून चढण सुरू केल्यानंतर परिसरातील निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडत जाते. मावळ परिसरातील पवना खोरे यांच्या परिसरात असलेला आणि बोर घाटाचा संरक्षण म्हणून अभेद्य पणे उभा असलेला किल्ला पर्यटनाचे सुंदर ठिकाण आहे .सध्या या किल्ल्यावरील महादेव मंदिर ,शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठी, विंचू कडा, दर्गा ,कोणी तलाव, गुहा, महा दरवाजा ,गणेश दरवाजा ,हनुमान दरवाजा इत्यादी ठिकाणे पाहून त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेतली. किल्ल्यावरील उंच फडकणारे ध्वज पाहून पर्यटकांच्या जय भवानी - जय शिवाजी अशा घोषणांनी या गडावरील वातावरण चैतन्यदायी झाले होते.