हदगाव दि. १९ :
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे आयोजित सहाव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अहमदनगर येथील सुप्रसिध्द साहित्यिक व चित्रपट अभिनेते सुभाष सोनवणे यांची निवड जाहिर करण्यात आली.
येत्या शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी संत रविदास सांस्कृतिक सभागृह, हदगाव जि. नांदेड येथे हे एक दिवसीय सहावे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी अहमदनगर येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, सुप्रसिध्द साहित्यिक, लेखक, विचारवंत आणि चित्रपट अभिनेते सुभाष का. सोनवणे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा या साहित्य चळवळीचे प्रणेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिता यादवराव उतकर आणि नागोराव गुणाजी गंगासागर यांनी हदगाव येथे केली.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मूळ रहिवासी असलेले मा. सुभाष सोनवणे यांनी पोलिस अधिकारी म्हणून विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावले व नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. पोलिस क्षेत्रात कार्यरत असतानाही एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणूनही त्यांनी आपले नाव कमावले आहे. "व्यथित सावल्या" आणि "स्नेहबंध" ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. "जयहिंद" आणि "मुसंडी" या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. "इनमीन साडेतीन" आणि "आशा अभिलाषा" या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले आहे.
सुभाष सोनवणे यांची पाच पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांना आत्तापर्यंत विसहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध विषयांवर व्याख्याने, काव्य सादरीकरण आणि विज्ञानवादी किर्तने, प्रवचने ते सादर करीत असतात. या व्यापक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी सुभाष सोनवणे यांची हदगाव येथील सहाव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड जाहिर केली आहे.
शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता हदगाव येथील संत रविदास सांस्कृतिक सभागृहात धारावी, मुंबई येथील माजी आमदार बाबुरावजी माने यांच्या हस्ते या सहाव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अनिता यादवराव उतकर आणि नागोराव गुणाजी गंगासागर यांनी हदगाव येथे पत्रकारांना दिली. यावेळी माधव सुर्यवंशी, दिलीप गंधारे, संतोष खंदारे, बालाजी सुर्यवंशी, अरविंद येलतवार, राजू वानखेडे यांचीही उपस्थिती होती.