नळदुर्ग , दि .१२ : एस.के.गायकवाड
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण हे सामान्य नागरीकांसह शासनाच्या हिताचे व फायद्याचे असून लवकरात लवकर राज्य सरकारने एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अन्यथा या आंदोलनाचे लोण सर्व राज्यभर पसरेल असा इशारा माजी नगरसेवक तथा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय बताले यांनी दिला.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांच्या राज्यभर सुरू असलेल्या संपास पाठिंबा देण्यासाठी नळदुर्ग शहर विकास आघाडीच्या वतीने शनिवार दि .११ रोजी नळदुर्ग बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
प्रारंभी शहरातील ऐतिहासिक चावडी चौक येथून मोर्चा काढण्यात आला. मुख्य बाजारपेठ मार्गे बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर या मोर्चाचे रुपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले. यावेळी आरपीआयचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, शरद देशमूख, भाजपाचे सुशांत भूमकर, पञकार तानाजी जाधव, एसटीचे माजी कर्मचारी अझहर जहागीरदार, विद्यमान कर्मचारी कालिदास जाधव व नळदुर्ग शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय बताले यांनी आपले विचार मांडले.
आरपीआय ( आठवले गट ), भाजपा, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, नळदुर्ग शहर पञकार संघ यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी नळदुर्ग पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
याप्रसंगी नगरसेवक महालिंग स्वामी, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके,धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, खय्युम कुरेशी, संजय बेले,रवी सुरवसे, रिपाइंचे शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, सुरेश लोंढे आदीसह विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.