काटी ,दि .५

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात शनिवार दि. 4 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद शिक्षण विभागा अंतर्गत मंगरुळ बीट स्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सावित्री ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

प्रारंभी माजी प्राथमिक शिक्षक संचालक डॉ. गोविंद नांदेडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता काबळे, सभापती रेणुका इंगोले, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर आदी मान्यवरांच्या हस्ते  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
   

 यावेळी  विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी प्रास्ताविकात लोकसहभागातून मंगरुळ बीट मध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन बीट अंतर्गत घेण्यात येत असलेल्या शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा सांगितला.
     

 यावेळी प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरुळ बीट स्तरीय घेण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी व जिल्हा परिषद शिक्षण विभाग उस्मानाबादचे कौतुक करुन उस्मानाबाद येथे शिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असताना मला उस्मानाबादने सन्मान, आदर, मानुसकी सर्व काही शिकायला मिळाल्याचे सांगून शिक्षकांना समाजामधून  सन्मान, प्रेम,आदर मिळाला तर शिक्षक सुध्दा चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम करतील असा विश्वास देऊन मंगरुळ बीट मधील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा कायम राखावी व वाडी, वस्ती, तांडा,दुर्गम भागातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे, त्यांच्या मधील अधिकारी शोधला पाहिजे हे स्वप्न प्रत्येक शिक्षकाने पाहिलं पाहिजे असे मत व्यक्त करुन मुल नुसती शिक्षित करून उपयोग नाही तर ती सुसंस्कारित, सुदृढ आणि सर्वगुणसंपन्न करणे ही आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेडे यांनी यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या बीट स्तरीय सावित्री महात्मा फुले शिक्षक पुरस्कार सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कॉम्पुटर युग आल, ऑनलाईन शिक्षण आले पण व्हॉट्स अप, फेसबुकच्या विळख्यात मुल गुरफटून गेली. अनेक विद्यार्थी लहान वयातच व्यसनाधीनतेकडे वळल्याचे सांगून व्यसनमुक्त देश, व्यसनमुक्त महाराष्ट्र हि संकल्पना  शिक्षकांनी राबवावी असे आवाहन केले. 
    

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे म्हणाल्या की, मंगरुळ बीट अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षकांचा गौरव व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आदर्शवत असून कोरोनानंतर शिक्षकांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन यापुढे जिल्ह्यात बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे सांगून 28 बालविवाह रोखण्यात यश मिळविल्याचे सांगून जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
      

 यंदाच्या बीट स्तरीय सावित्री ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार 15 शिक्षकांना मिळाला असून 27 शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीचे बीट स्तरीय शिक्षक पुरस्कार दिपक ढोणे(जिल्हा परिषद शाळा बसवंवाडी), प्रमोद डोंगरे आरळी (बु.), गुणवंत काळे हिप्परगा (ताड), सुधीरसिंग चव्हाण आरळी (बु.), श्रीमती श्रीदेवी कोळसुरे मंगरुळ, विजयकुमार गायकवाड कुंभारी, श्रीमती मनिषा वाघमारे धोत्री, गोवर्धन मुंढे कसई, संजय वाघमोडे मंगरुळ, महादेव गायकवाड नांदुरी, बक्षुद्दीन शेख मंगरुळ, अनिल घुगे मंगरुळ, श्रीमती मनिषा कांबळे चिंचोली, श्रीमती शितल होमकर काटगाव, विवेक नवले चिवरी या शिक्षकांना सावित्री ज्योतिबा फुले पुरस्कार देवून सपत्नीक गौरवण्यात आले. तसेच 5 वी 8 वी व एनएमएमएस मधील शिष्यवृत्ती धारक व नवोदय विद्यालय प्रवेशासाठी उल्लेखनीय यश मिळवलेल्या अशा एकूण 27  यशस्वी  विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
      
 यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता  कांबळे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, सभापती रेणुका इंगोले, भिवाजी इंगोले, जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, विस्तार अधिकारी मल्हारी माने, विस्तार अधिकारी काळे, केंद्र प्रमुख संजय वाले, विठ्ठल गायकवाड,शिक्षक संघटनेचे बिभिषण पाटील, विक्रम पाटील, बशीर तांबोळी, कल्याण बेताळे, राजकुमार म्हेत्रे, शिवाजी साखरे,  पंडागळे, घोंगडे, केशव काळे, प्रशांत गायकवाड, नागनाथ वडणे, डि. एम. चव्हाण, श्रीमती रंजना स्वामी, शांताराम गायकवाड,देशभुषन दुरुगकर, पोपट सुरवसे आदीसह तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. 
       
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  शिवाजी साखरे व रंजना स्वामी यांनी केले तर आभार विठ्ठल गायकवाड  यांनी मानले.
 
Top