लोहारा , दि . १९ :
लोहारा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित व्हावी यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले सातत्याने प्रयत्नशील आहेत. मी ही विधानपरिषद सदस्य आहे. त्यामुळे लोहारा शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी यापुढील काळात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आमदार चौगुले यांच्यासोबत मी ही प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी केले.
लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. त्याप्रमाणे नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेने आघाडी करून उमेदवार उभे केले. या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मिटकरी हे बोलत होते.
या प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी लोहाऱ्याचे माजी सरपंच नागन्ना वकील हे होते. यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुभानआली शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, लोहारा शहराच्या विकासासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांची नेहमी तळमळ दिसून येते. विकासकामांसाठी त्यांनी आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही देतील. पुढील काळात लोहारा शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक असेल तेंव्हा माझाही विधानपरिषदेचा निधी याठिकाणी देईन असे प्रतिपादन करत सध्या सरकार आपले आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारे सर्व खाते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, लोहारा शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आपण प्रत्येक प्रभागात विंधन विहिर घेऊन काही अंशी पाणीटंचाई दूर केली आहे. शहराला माकणी धरणाचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु काही निष्क्रिय नगरसेवकांमुळेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रखडली असल्याचा आरोप केला. पुढील दीड वर्षाच्या कालावधीत माकणी धरणातून शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी नगरपंचायतची सत्ता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या हाती द्या असे आवाहन आमदार चौगुले यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुभानआली शेख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर साठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, तालुका उपप्रमुख सुधाकर पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, अबुलवफा कादरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयुब शेख यांच्यासह अविनाश माळी, जालिंदर कोकणे, विजय लोमटे, जगन्नाथ पाटील, पंडित पाटील, अभिमान खराडे, मयुरी बिराजदार, शामल माळी, पौर्णिमा लांडगे, शरीफा सय्यद, सुमन रोडगे, वैशाली खराडे, शम्माबी शेख, अक्षता लांडगे, गौस मोमीन, श्रीकांत भरारे, शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सर्व उमेदवार व दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.