वागदरी , दि . १२ : एस.के.गायकवाड
जवाहर महाविद्यालय अणदूर ता . तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करियर कट्ट्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी करीअर कट्ट्याचे समन्वयक प्रा. विवेकानंद वाहुळे, प्रा. डॉ एस. जी. बिराजदार, प्रा. डॉ. एम. एम. लंगडे, प्रा. डॉ. अनिता मुदक्कणा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक येथे संपन्न झालेल्या संमेलनात कविता सादर केलेल्या आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी विजय जाधव याचा सत्कार करण्यात आला. यावेळी 'माय बाप' या कवितेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी चनशेट्टी यानी युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सुखाच्या लालसे पेक्षा सहासाची ओढ ज्याच्यात असते, तो खरा तरुण. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागरूक राहून मर्दुमकी गाजवायची आहे.
भारत हा तरुणांचा, युवकांचा देश आहे. सतत मोबाईलमध्ये डोके घालून बसणारे युवक, देशासाठी, स्वतःसाठी धोकादायक आहेत. आभासी जगात पब्जी सारख्या खेळात अडकून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका , आपला देश जगावर राज्य करेल' तो तरुणांच्या बळावर. मोबाईलचा योग्य वापर करून आपले व्यक्तिमत्त्व फुलवा. उच्च शिक्षण घ्या, मोठे अधिकारी बना, करीअर घडवा. असा मोलाचा संदेश दिला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी केले.