जळकोट,दि.२२
तुळजापूर तालुक्यातील
अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विषयाचे प्रमुख प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांना मुंबई येथील हाॅटेल ताज महाल पैलेसमध्ये आनंदश्री फांउडेशनच्यावतीने प्रसिद्ध वैज्ञानिक मिहिर पांडा, उद्योगपती संजीव कुमार, समाजसेवक डॉ.संदीपसिंह, टी.वी.सीरियल व सिने अभिनेत्री एलिजा खान, प्रसिद्ध अभिनेत्री व माॅडेल रोशनी कपूर, डॉ. दिनेश गुप्ता व डॉ. अनिता गुप्ता यांच्या हस्ते अमेजिंग इंडियन पर्सनेलिटी अवार्ड आणि साऊथ वेस्टर्न अमेरिकन यूनिवर्सिटीची शैक्षणिक क्षेत्रातील संस्कृत विषयातील सर्वोच्च मानद डि.लिट.ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. राऊत यांच्या गेल्या २६ वर्षातील शैक्षणिक कामाचा व कोरोना काळातील सामाजिक कार्याचा आढावा घेऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात गोरगरिबांना अन्नदान, मास्क व सॅनिटायजर वाटप तसेच विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर विविध निबंध व काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रा.राऊत यांचे पाच काव्यसंग्रह संपादित असून प्रेम काव्यसंग्रहाची ओएमजी जागतिक पुस्तकात नोंद झालेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमात संस्कृत सरिता, गीर्वाण मंजिरी व हितोपदेश ही तीन संपादित पुस्तके समाविष्ट आहेत.
राज्य व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेली असून शंभरपेक्षाही अधिक विविध पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार व डि.लिट पदवी मिळाल्याबद्दल अणदूरगावचे सरपंच श्री. रामचंद्र आलुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, प्राध्यापक बंधुभगिनी व सोमनाथ खडके व महादेव राऊत यांनी अभिनंदन केले आहे. राऊत यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.