वागदरी , दि . १८
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलनिकरण करून एसटी बस कर्मचाऱ्याना राज्य सेवेत सामावून घ्यावे, तसेच तुळजापूर तालुक्यातील सन २०२१ मधिल खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या विमा रक्कमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांची हक्काची विमा रक्कम द्यावी अन्यथा पुढील काळात तिव्र आंदोलन करण्याचा सज्जड इशारा जळकोट ग्रामविकास आघाडी जळकोट ता.तुळजापूरचे प्रमुख तथा माजी जि.प.सदस्य गणेश सोनटक्के यांनी दिला.
गेल्या पन्नास दिवसापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी व तुळजापूर तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या विमा रक्कमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विमा रक्कम त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करावी या प्रमुख मागण्यांसाठी जळकोट ता.तुळजापूर येथे शनिवारी जळकोट ग्रामविकास आघाडी जळकोटच्या वतीने येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर छत्रपती शिवाजी महाराज चौका समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी गणेश सोनटक्केहे बोलत होते.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे यांनी जळकोट ग्रामविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. तर नळदुर्ग शहर विकास आघाडीचे प्रमुख संजय बताले यांनी ही सत्ताधारी राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टिका करून एसटीच्या विलनिकरणाची मागणी केली.
यावेळी माजी सरपंच संजय माने,अँड. आशिष सोनटक्के, एसटी कर्मचारी बालाजी पाटील, कालीदास जाधव, अरूण लोखंडे, ओंकार हंडे, आदींनीआपले मनोगत व्यक्त केले. याआंदोलनाचे सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले. यावेळी बंकट बेडगे,अनिल छत्रे, भाजपा प्रसिद्धीविभाग तालुका प्रमुख किशोर धुमाळ,संजय अंगुले, सलीम जमादार, सय्यद तांबोळी, रोहित कदम, वसंत सोनटक्के, आप्पु किलजे,राम भोगे,इराण्णा स्वामी,अनिल बेडगे,कलिम जमादार,आदीसह सम विचारी विविध पक्ष,संस्था व संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.