नळदुर्ग , दि . ०३
तुळजापूर तालुक्यातील मुंबई - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी टोलनाक्यावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वाढत्या अरेरावी याबाबत विचारपूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांची टोल कर्मचारी व अधिकारी यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि प्रशांत नवगिरे यांनी टोल फोडला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की ,
गेल्या अनेक दिवसांपासून या टोलनाक्यावरील कर्मचारी व अधिका-यांकडुन अणदूर, जळकोट, नळदुर्ग, फुलवाडी, धनगरवाडी व इतर अनेक जवळच्या गावातील वाहनधारकांना अपमानित केले जात होते . इतकेच नव्हे तर प्रत्येक वेळी पोलीसांना बोलावून वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते . टोल कंपनीच्या जाचाला नागरीक व वाहनधारक कंटाळले असुन याबाबत जाब विचारत असताना मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यां मध्ये बाचाबाची झाली आणि प्रशांत नवगिरे यांनी टोल कंपनीला धडा शिकविण्यासाठी मनसे स्टाईल खळ्ळ खटयाक आंदोलन करीत टोल बुथ फोडले .
टोल कंपनीच्या अधिकार्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नवगिरे यांच्या विरोधात तक्रार दिली असुन पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत नवगिरे यांना विचारले असता, फुलवाडी व तलमोड हे दोन्ही टोलनाके लुटमार केंद्र बनल्याचे सांगुन या टोल महामार्गावरील सर्वच उड्डाणपुले, सव्हिस रोड, व्हिलेजरोड, व इतर सर्वच कामे हि अर्धवट स्थितीत असुन कुठलेच काम पूर्ण करण्यात आले नाही . या महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होऊन निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. प्रवाशांना सुविधा न देता बळजबरीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने या टोल वाल्यांच्या माध्यमातुन लोकांची प्रचंड आर्थिक लूट सुरु असल्याचे सांगितले .
या दोन्ही टोलनाक्यावरून दररोज सुमारे ३० लाख रुपये वसुल केले जात आहेत . रस्त्यांची दुरुस्ती नाही . सर्वच कामे निकृष्ठ व अर्धवट आहेत . तर पैसा जातो कुणाच्या घशात ? कोणाच्या चुकीमुळे जनतेला हा भुर्दंड भरावा लागत आहे. नियमानुसार हे टोल नाके सुरु होऊ शकतात का ? याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असुन या टोलकंपनीवर कारवाई करावी, रस्ते व इतर सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुल करु नये . या बाबतची निवेदने व तक्रारी अनेकदा गेल्या दिडवर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद, जिल्हा पोलीस अधिक्षक उस्मानाबाद, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर, यांना वारंवार देण्यात आलेली आहेत .
परंतु यांचेकडून अद्यापपर्यंत या लूटमार टोलबाबत कसलीही कारवाई करण्यात आली नाही . या महामार्गावर केवळ निकृष्ठ, अर्धवट कामे व खड्यांमुळे जवळपास १५०० लोकांचे प्राण गेलेले आहेत. यास जबाबदार कोण ? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो . याबाबत आपण पाठपुरावा करून यातील दोषींना धडा शिकविणार आहोत . तसेच लवकरच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपण याबाबतची सर्व माहिती त्यांना देणार असल्याचे नवगिरे यांनी सांगितले.