काटी , दि . ०१ : उमाजी गायकवाड
सरत्या वर्षाला निरोप देतांना नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपरा तरुणाईमध्ये दरवर्षी बघायला मिळत असते. सरत्या वर्षाला निरोप देताना संमिश्र भावना दाटून आल्या..कोरोनानामक राक्षसाच्या विळख्यानं अनेकांच्या प्राणप्रिय व्यक्ती दुरावल्या गेल्या. या कोरोनासारख्या महाभयानक संकटाच्या काळात ज्यांचा आधार वाटावा अशी रक्ताची माणसं दुरावल्याचं दुर्दैवी चित्र पहायला मिळाले. एकूणच हे वर्ष सर्वांनाच क्लेशदायक ठरल्याचे दिसून आले.
प्रत्येक वर्षी नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने आपल्या मित्र-मैत्रिणी आणि आप्तेष्टांसाठी भेट वस्तू खरेदी करण्यावरही अनेकांचा भर असतो मात्र, आधीच असलेला करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात ओमायक्रॉनचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने तरुणाईच्या उत्साहाला बंधने घातल्याने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत तरुणाईने अगदी साधेपणाने नववर्षाचे स्वागत केल्याचे दिसून आले. यंदा 31 डिसेंबर रोजी बाजारपेठेत भेटवस्तू खरेदी करण्यासह हॉटेलिंग, ग्रामीण भागातील मटन पार्ट्या असे विविध प्लॅन युवकांकडून आखण्यात येत असतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा धोका असल्याने नववर्षाचे स्वागत साधेपणानेच करण्यात आले आहे. यंदा करोनाचा प्रादुर्भाव राहणार नाही, अशी तरुणांना आशा होती. मात्र, बुधवारी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. त्यानुसार खबरदारी म्हणून जास्त लोकांनी एकत्र न येता सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेक युवकांनी 'थर्टी फर्स्ट' आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर न पडता अत्यंत साधेपणाने घरच्याघरी पार्टी केल्याचे चित्र दिसून आले.
मागील दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी जनता सामना करीत आहे. या कटू अनुभवांना माग सारुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ यात. कोरोनानंतर ओमायक्रॉनचं संकट आहेच. पण आता सर्वांचीच अशा महामारीला सोबत घेऊन जगण्याची मानसिकता निर्माण झालीयं.आता सर्वांनीच अशा संकटांना धीरोदात्तपणे तोंड देण्याची तयारी ठेवू यात. हे आयुष्य खूप मोलाचे आहे..त्याला कोरोना नियमांचे पालन नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करु यात..!!
करोनाची स्थिती लक्षात घेता यंदा अगदी मोजकेच मित्रांनी पार्टी करुन सेलिब्रेशन केले. नववर्षाच्या स्वागताचा आनंद हा आरोग्याहून अधिक मोठा नाही.
करीम बेग
नागरिक काटी ता.तुळजापूर