काटी , दि. ०२ : उमाजी गायकवाड 

 तुळजापूर  तालुक्यातील काटीसह परिसरातील  सावरगाव, केमवाडी, वडगाव ( काटी) , गंजेवाडी, दहिवडी, खुंटेवाडी, वाणेवाडी, तामलवाडी, पिंपळा, खुंटेवाडी, आदी  परिसरातील गावात रविवार दि.  2  जानेवारी रोजी रोजी दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा झाला. 

येथील  शेतकऱ्यांसह शहरी कुटुंबीयांनी  ग्रामीण भागात येऊन  येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटला. त्यामुळे रविवारी  दिवसभर काटीसह परिसरातील गावांमध्ये शुकशुकाट दिसून आला. गावातील  सर्व  दुकाने  बंद  ठेवून  वनभोजनाचा सर्वानी आनंद  लुटला.  

        
दर्शवेळा अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. मित्र व नातेवाइकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासून शहरांतून गावाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर  गर्दी दिसत होती.  परिणामी काटीसह परिसरातील  सर्व  गावात  दिवसभर शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा व काळ्या आईची ओटी भरण्यात आली. त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, अंबिल, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी आदींचा आस्वाद घेतला.

 ज्यांना शेती नाही अशांनी नातेवाईक,  मित्रमंडळीच्या शेतात जाऊन  वनभोजनाचा आनंद  घेतला. सायंकाळी उत्तरपुजा करून वेळ अमावस्या सणाची सांगता करण्यात आली.
 
Top