तुळजापूर , दि. ०२
तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडीसह परिसरात दर्शवेळ अमावस्येचा (येळवस) सण दि.२ जानेवारी रोजी उत्साहात साजरा झाला. काळ्या आईला सजविण्याचा तसेच खाऊ घालण्याचा सण म्हणून गणली जाणारी वेळ अमावस्या साजरी करण्याची परंपरा यंदाही तालुक्यातील बिजनवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी जपली.
दर्शवेळा अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे, ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात, मित्र व नातेवाईकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. अमावस्याला शेतात कडब्याची खोप करून पांडवांची विधिवत पूजा करून बालगोपाळांसह महिला सुद्धा येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, आंबील, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, शेंगदाण्याचे लाडू, पोळी आदींसह रानमेव्याचा आस्वाद घेत सगळे येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटतात.