वेळ अमावस्या निमित्त केमवाडी ता तुळजापूर येथे शेतात पूजा करताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड अनिल काळे
तामलवाडी , दि . ०२
अनेक वर्षांची परंपरा असलेला वेळा अमावस्या म्हणजेच येळवस हा सण रविवारी तामलवाडी ता. तुळजापूर शिवारात उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला.
मार्गशीष महिन्याची दर्शवेळा अमावास्या हि ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. मित्र व नातेवाइकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. रविवारी सकाळपासून शहरातून गावात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसत होती. गावा-गावात दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता.
शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा केली त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी, बाजरी भाकरी, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी, आंबील आदींसह रानमेव्याचा आस्वाद घेतला. ज्यांना शेती नाही अशांनी नातेवाईक व मित्रमंडळीच्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला. सर्व शिवार माणसांच्या वर्दळीने फुलून गेले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत शेत शिवारातील शेतकरी पांडवांची मनोभावी पूजा करण्यात मग्न होते. हर हर हर महादेव असा जयघोष शेत शिवारात घुमत होता.