चिवरी , दि . ३० राजगुरू साखरे
कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा -जत्रा , उत्सव यावर गत दोन वर्षांपासून निर्बंध घालण्यात आले आहे. यंदा कोरोनचे सावट दूर होत असल्याचे चित्र दिसत असताना, पदरात दोन पैसे पडतील अशी आशा लोककलावंत मनाशी बाळगून होते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा शिरकाव केल्याने पुन्हा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंधात वाढ झाली आहे.
त्यामुळे कलावंताच्या आशेची निराशा झाली आहे. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीपासून गावची यात्रा तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू होत असतो. यामुळे या काळात यात्रेनिमित्त होणारे ऑर्केस्ट्रा, तमाशाचे फड, तसेच देव देवतांचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून आपली कला सादर करणाऱ्या लोककलावंतांच्या कलेवर मात्र संक्रात आली आहे हे. कलावंत सध्या आर्थिक विवंचनेत सापडले असून रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र हे लोककलांचे आगर आहे, आजही ग्रामीण भागात यात्रेमध्ये तमाशा फड तसेच आर्केस्ट्रा या कार्यक्रमाला मोठी मागणी आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरूना च्या प्रादुर्भावामुळे हे कार्यक्रम होत नाहीत.
त्यामुळे या कार्यक्रमावर अवलंबून असणारे ढोलकी वादक, हार्मोनियम वादक, नर्तिका, नाच्या, सोंगाड्या, सरदार , अशा एक ना अनेक कलावंतावर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. त्याच बरोबर देव देवतांचे गोंधळ, भारुड ,जागरण,किर्तन, आराधी गीते, पोतराज गीते आदी सर्वच लोक कला आज थांबल्या आहेत. आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी कला सादर करणारा लोककलावंत मात्र आज आर्थिक विवंचनेत अडकला असल्याचे दिसत आहे, आपल्या कलेच्या सादरीकरणातून मिळालेल्या बिदागीरीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो, मात्र कोरोनाने सर्व काही हिरावून घेत त्यांचा रोजगारच नाहीसा केला आहे, एकंदरीत यंदाही कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा सामना कलावंतांना करावा लागत आहे, यामुळे पिढ्यानपिढ्या आपल्या कलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांना आज मात्र आर्थिक विवंचनेने छायेत जीवन जगावे लागत आहे.