अणदुर , दि . ८ : श्रीकांत अणदूरकर

"पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन सध्याच्या काळात पत्रकारांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्यांनी त्यांची लेखणी सध्या सगळ्यात जास्त अडचणीत असलेल्या
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून द्यावा" असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. 

 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ( पत्रकार दिन) अणदूर  ता. तुळजापूर येथील जयमल्हार पत्रकार संघ आयोजित "दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण भागातील पत्रकार सन्मान सोहळ्यात माजी मंञी मधुकरराव चव्हाण हे   अध्यक्षीय समारोप प्रसंगी  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, शिवसेना नेते बाळकृष्ण घोडके पाटील , श्री श्री रविशंकर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे, माजी मुख्याध्यापक भगीरथ कुलकर्णी, प्रा. अनिता मुदकन्ना, जयमल्हार पत्रकार संघाचे प्रमुख अजय अणदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या लेखणीतून लोकशाही बळकट करावी तसेच,सर्व सामान्य माणसाच्या व्यथा बातमीतून मांडाव्यात जेणे करून त्यांना न्याय मिळेल, जयमल्हार पत्रकार संघाने ग्रामीण भागातील 42 पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करून समाजात एक चांगला संदेश दिला आहे. 
जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, फेटा, पुष्पगुच्छ देऊन   ग्रामीण पत्रकारांचा आदर्श पत्रकारीता पुरस्काराने सन्मान करण्यात आला व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कै.सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  जय मल्हार पत्रकार संघ अणदूर यांच्यावतीने वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले  जातात  तर  कोरोनास हद्दपार करण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून  पत्रकार  संघाने गाव, शहर, वाड्या वस्तीत जाऊन प्रबोधन केले आहे. त्याचा एक लघुपट या वेळी दाखवण्यात आला, आगामी काळात येणा-या "पिंगळा "या मराठी चित्रपटात काम करण्यासाठी अणदूर येथील पत्रकार दयानंद काळुंके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान  करण्यात आला. यावेळी रामचंद्र आलूरे ,भगीरथ कुलकर्णी, जितेंद्र कानडे, यांची भाषणे झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. बी. बिराजदार व प्रा. संतोष पवार यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार दयानंद काळुंके यांनी केले व, आभार पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांनी मानले.

 हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल व पत्रकार दिनाबद्दल जागर महिला मंडळ व श्री श्री रविशंकर विद्यामंदिर तर्फे जयमल्हार पत्रकार संघातील 10 सदस्यांचा फेटा, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार पत्रकार संघातील दयानंद काळुंके, शिवशंकर तिरगुळे, चंद्रकांत गुड्ड, संजीव आलूरे, सुदर्शन मोकाशे, चंद्रकांत हगलगुंडे, लक्ष्मण दुपारगुडे, बंडू तोग्गी, सचिन गायकवाड आदी पत्रकारांनी पुढाकार  घेतले.

 
Top